दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला, जनसुनावणीवेळी कानशिलात लगावली

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर एका अज्ञात व्यक्तीने हल्ला चढवला. बुधवारी त्यांच्या निवासस्थानी जनसुनावणी सुरू असताना एका व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले असून पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र सदर व्यक्ती काही कागदपत्र घेऊन रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी आला होता. यादरम्यान त्याने रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला चढवला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या निवासस्थानी बुधवारी जनसुनावणी सुरू होती. यावेळी आपली तक्रार मांडण्यासाठी आलेल्या एका तिशीच्या वयातील व्यक्तीने रेखा गुप्ता यांच्या कानशिलात लगावली. यामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी हल्लेखोराला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. भाजपनेही या घटनेची पुष्टी केली आहे. ‘इंडिया टुडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने प्रथम कागदपत्रे रेखा गुप्ता यांना दिली, त्यानंतर तो ओरडू लागला आणि आरडाओरडा करत अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सध्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात त्याची चौकशी सुरू आहे. या घटनेचा भाजप नेत्यांनी निषेध केला आहे.

दरम्यान, या घटनेवर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुख्यमंत्री संपूर्ण दिल्लीचे प्रतिनिधित्व करतात आणि अशा घटनांचा जितका निषेध केला जाईल तितका तो कमीच ठरेल, असे माझे मत आहे. पण या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न समोर आला आहे. जर दिल्लीच्या मुख्यमंत्रीच सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्य पुरुष किंवा सर्वसामान्य महिला कशा सुरक्षित राहतील? असा सवाल दिल्ली काँग्रेस अध्यक्ष देवेंद्र यादव यांनी उपस्थित केला.