>> नीलेश कुलकर्णी
आम आदमी पक्षातील मनीष सिसोदिया, संजय सिंग, राघव चढ्ढा यांच्यासह अनेक तगडय़ा नेत्यांच्या दावेदारीला बाजूला करत अरविंद केजरीवालांनी अतिशी मरलेना यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक करून ‘मास्टरस्ट्रोक’ खेळल्याची चर्चा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरलेले असताना अतिशी या केजरीवालांना अपेक्षित अशी ‘राजकीय आतषबाजी’ करून शीला दीक्षित यांच्यासारख्या दिल्लीच्या सर्वोच्च नेत्या बनणार की सुषमा स्वराज यांच्याप्रमाणे त्यांनाही औट घटकेच्या मुख्यमंत्रीपदाची गादी मिळणार? हा मोठा प्रश्न आहे.
अवघ्या दीडेक वर्षापूर्वी दिल्लीच्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री बनलेल्या अतिशी मरलेना यांच्या गळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची माळ अनाहूतपणे पडली. ‘आप’चे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत अतिशी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करत सर्वांनाच धक्का दिला. अतिशी या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असल्याने त्यांची तुलना सदैव शीला दीक्षित व सुषमा स्वराज, विशेषत्वाने शीला दीक्षितांशी केली जाणार. या सर्व अपेक्षांचे ओझे अतिशी पेलवून आपला पुन्हा दिल्लीची सत्ता मिळवून देतील काय? हाही मोठा प्रश्नच आहे. केजरीवालांनी मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान आलिशान करण्यासाठी करोडो रुपये खर्च केल्याचा आरोप भाजपने केला. त्यामुळे नाही म्हटले तरी केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का बसला. आता या ‘शीश महाला’तून केजरीवाल यांचीही ‘सुटका’ होईल व रस्त्यावर उतरून संघर्ष करणारे 2012 मधले केजरीवाल देशाला पाहायला मिळतील, अशी आशा करायला हरकत नाही.
अरविंद केजरीवाल तुरुंगात असताना त्यांच्या अपेक्षेनुसार काम केल्याची बक्षिसी अतिशी यांना मिळाली. तब्बल चौदा खाती सांभाळणाऱ्या अतिशी यांनी प्रशासनात चुणूक तर दाखवलीच, शिवाय भाजपच्या हल्ल्यालाही त्या खंबीरपणे सामोऱ्या गेल्या. केजरीवाल तुरुंगात असल्यामुळे आपच्या कार्यकर्त्यांचे मनोबल ढासळले होते. त्यांना सावरण्याचे कामही अतिशी यांनी केले. अर्थात या सगळ्या सकारात्मक बाबी असल्या तरी पुढची निवडणूक जिंकणे हे आपसाठीही तितकेसे सोपे राहिलेले नाही. इंडिया आघाडीत काँग्रेस व आप दोन्ही पक्ष एकमेकांचे सहकारी असले तरी हरयाणातील विधानसभा निवडणुका दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्याचा फटका हरयाणात काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे. तीच स्थिती दिल्लीच्या विधानसभेत राहिली तर भाजपचे फावल्याची शक्यता अधिक. त्यातच अतिशी यांना मुख्यमंत्री केल्याने आपमध्येही नाराजांची संख्या कमी नाही. या पार्श्वभूमीवर दिल्लीत पुन्हा आपचे सरकार आणणे हे अतिशी यांच्यापुढचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपने केजरीवाल भ्रष्ट असल्याचे रचलेले नरेटिव्ह प्रभावी ठरत आहे. त्यामुळेच केजरीवालांना तातडीने राजीनामा देणे भाग पडले आहे. गेल्या दहा वर्षांतील सरकारविरोधातील अँटी इन्कम्बन्सीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळेच दिल्लीत भाजपच्या आशा कधी नव्हे त्या पल्लवित झाल्या आहेत. दिल्लीत राजकीय आतषबाजी करण्यासाठी दिवाळीपूर्वीच अतिशींकडे दिल्लीची जबाबदारी देण्यात आली आहे. बघू या उच्चविद्याविभूषित अतिशी राजकीय आतषबाजी करतात की नाही ते.
हसीना कहा है?
दिल्लीत राजकीय आश्रयाला आलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आहेत कुठे? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. शेख हसीना दिल्लीत वायुसेनेच्या हिंडेनबेस विमानतळावर उतरल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करण्यात आला होता. नरेंद्र मोदी हे कसे ‘विश्वगुरू’ आहेत व ते जगातल्या कोणत्याही देशातली युद्धे मिटवू शकतात. देशांतर्गत बंडाळी संपवू शकतात, असे बोलले गेले. मात्र बांगलादेशच्या भूमिकेवरून हिंदुस्थानची जागतिक राजकारणात गोची झाली. बांगलादेशात हिंदूंना अनन्वित छळाला सामोरे जावे लागले. तिकडचे ‘हिंदू खतरे में’ असताना इकडे मात्र शेख हसीना आपली मुलगी सायमा वाजीद यांच्या सोबत दिल्लीत शॉपिंग करताना आणि लोधी गार्डनमध्ये वॉक करताना दिसून येतात. दिल्लीत आल्यानंतर आपल्याला लगेच युरोप, सौदी अरब किंवा अमेरिकेत आश्रयाला जाता येईल हा शेख हसीना यांचा होरा होता. मात्र नरेंद्र मोदी सरकारच्या धसमुसळ्या विदेशी धोरणाचा फटका हसीना यांनाही नाहक बसला. ‘‘तुम्ही हिंदुस्थानात कशाला आश्रय घेतला?’’ असा आक्षेप काही देशांनी नोंदवला. आपली ही फटफजिती जगजाहीर होऊ नये यासाठी शेख हसीना ‘कव्हर’ न करण्यासाठी केंद्र सरकारकडून मीडियावर दबाव टाकण्यात आला आहे.
योगी कुठे आहेत?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे कुठे ‘गायब’ झाले आहेत? असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे जम्मू-कश्मीर व हरयाणा या दोन राज्यांत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात असताना भाजपचे कथित ‘हिंदुत्ववादी पोस्टर बॉय’ योगी महाराजांची कुठे एकली दुकलीदेखील सभा या दोन्ही राज्यांत झालेली नाही. जम्मू-कश्मीरमध्ये तर योगींसारख्या धार्मिक ध्रुवीकरण करू शकणाऱ्या नेत्याची गरज होती. मात्र योगी राजकीय परिदृश्यातून गायब झाले आहेत. योगींच्या गायब होण्यामागे दोन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे उत्तर प्रदेशात विधानसभेच्या पोटनिवडणुका आहेत. या पोटनिवडणुकीतील कामगिरीवरच योगींची खुर्ची राहणार की ते पुन्हा गोरखपूरच्या मठात जाणार? याचा फैसला होणार आहे. त्यामुळे योगींनी या पोटनिवडणुकांवरच फोकस केल्याचे सांगितले जात आहे. दुसरे म्हणजे योगींना हटविण्यासाठी दिल्लीकर महाशक्तीने मध्यंतरी मोठे डावपेच टाकले. मात्र नागपूरच्या सहकार्याने योगींनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची तूर्तास वाचविली आहे. मात्र खुर्चीवरचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. योगी आपल्याला धूप घालत नाहीत हे लक्षात आल्यानंतर योगींचा कार्यक्रम करण्याचा एक ‘कार्यक्रम’ महाशक्तीने हाती घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपची कामगिरी सुमार झाली. योगींनीच नरेंद्र मोदींना बहुमत मिळू नये म्हणून भाजपचे उमेदवार पाडले अशी कुजबुज भाजपच्याच वर्तुळात ऐकायला मिळते. त्यामुळे दिल्लीकर अगोदरच योगींवर खार खाऊन आहेत. अशा स्थितीत जम्मू-कश्मीरमध्ये योगींना प्रचाराची संधी दिली तर त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वालाही मान्यता दिल्यासारखे होईल. त्यामुळे योगी कश्मीर व हरयाणात पाऊल टाकणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली आहे. थोडक्यात योगींचे ‘स्टार’ सध्या तरी ठीक दिसत नाहीत!