सावधान ! फटाके उडवाल तर जेलमध्ये जाल

दिवाळीला अवघे काही दिवस उरले असून यावेळी जर भरपूर फटाके उडवण्याचा विचार तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण फटाके उडवल्यास तुमची रवानगी थेट तुरुंगात होऊ शकते. तसेच सोबत कोट्यवधी रुपयांचा दंडही तुमच्याकडून वसूल केला जाऊ शकतो. पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत प्रदूषण करणाऱ्या व्यक्तीला पाच ते सात वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेबरोबरच दंडही वसूल करण्याची तरतूद आहे.

सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि जेष्ठ वकील जितेंद्र मोहन शर्मा आणि अॅडव्होकेट कालिका प्रसाद काला यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे. त्यानुसार हवेतील प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि वायु प्रदूषण नियंत्रण अधिनियम बनवण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वच राज्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल स्थापन केले आहे. हवेतील प्रदूषण रोखण्याचे आदेश देणे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.

10 कोटी पर्यंत होऊ शकतो दंड

अॅडव्होकेट काला यांच्या मते नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनलला प्रदूषण पसरवणाऱ्या व्यक्तीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्याचा आणि 10 कोटी रुपये दंड ठोठावण्याचा अधिकार आहे. तसेच जर दंडाची रक्कम आणि तुरुंगवासाची शिक्षा ठोठावूनही प्रदूषण करण्यात येत असेल एनजीटीच्या आदेशाचे उल्लंघन होत असेल तर दररोज 25 हजार रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो.

शुद्ध हवा हा मूलभूत अधिकार-सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ अॅडव्होकेट जितेंद्र मोहन शर्मा याबद्दल म्हणाले की शुद्ध हवेचा संबंध आयुष्याशी आहे. यामुळे हवा प्रदूषित करण्याचा अधिकार कोणालाही  नाही. संविधानतीत अनुच्छेद 21 नुसार शुद्ध हवा हा मूलभूत अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयानेही आपल्या निर्णयात हे स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या