
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांचे शनिवारी रात्री हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते न्यूमोनियाने आजारी होते. शनिवारी रात्री प्रकृती ढासळल्याने त्यांना एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात एक मुलगी व दोन मुलगे असा परिवार आहे.
जयपाल रेड्डी यांचा जन्म 16 जानेवारी 1942 साली हैदराबाद येथील मदगुल येथे झाला. तेलगू राजकारणातील दिग्गज नेते म्हणून त्यांची ओळख होती. आंध्र प्रदेशचे ते चारवेळा आमदार होते. तर 5 वेळा खासदार म्हणूनही निवडून आले होते. विज्ञान आणि अर्थ तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला होता. त्याआधी 1998 साली माजी पंतप्रधान इंद्र कुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती.
Telangana: Former Union Minister and Congress leader, Jaipal Reddy, passes away in Hyderabad. (File pic) pic.twitter.com/kqbCJAH7jH
— ANI (@ANI) July 27, 2019
1999 साली 21 वर्षांनंतर त्यांनी काँग्रेसवापसी केली होती. माजी पंतप्रधान दिवंगत इंदीरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केल्यानंतर रेड्डी यांनी 1977 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्टी देत जनता पार्टीकडे मोर्चा वळवला होता. इंदीरा गांधी यांच्याविरोधात त्यांनी आंदोलन छेडले होते. रेड्डी यांनी 1980 मध्ये इंदीरा गांधी यांच्याविरोधात निवडणूकही लढवली होती. पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.




























































