राजनाथ सिंह, सोनिया गांधी, राहुल गांधी, स्मृती इराणी यांची प्रतिष्ठा पणाला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

लोकसभेच्या महासंग्रामात देशातील 7 राज्यांत 51 मतदारसंघांत 6 मे रोजी मतदान होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात भाजप नेते, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्यवर्धनसिंह राठोड, राजीव प्रताप रुढी आदी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून देशातील जनतेचे लक्ष याकडे लागले आहे.

यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली या काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात भाजपचे दिनेश प्रताप सिंह नशीब अजमावत आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. काँग्रेस आणि भाजपने ही लढत खूपच प्रतिष्ठेची केली असून मैदान कोण मारणार याची सर्वांना उत्सुकता आहे. लखनौमधून केंद्रीय मंत्री राजनाथसिंह लढत देत आहेत. उत्तर प्रदेशमधील 14 मतदार संघांपैकी 12 मतदार संघ हे भाजपच्या ताब्यात असून या जागा कायम राखण्याचे आवाहन भाजपसमोर आहे.

बिहारमधील पाच मतदार संघांमध्ये मतदान होत असून भाजपची खरी लढत लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलसोबत (राजद) होणार आहे. सारनेर मतदार संघातून भाजप नेते, राज्यसभा सदस्य राजीव प्रताप रुढी हे नशीब अजमावत असून त्यांची लढत लालू प्रसाद यादव यांचे व्याही चंद्रिका राय यांच्याशी होणार आहे. झारखंडचे दोन माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी आणि अर्जुन मुंडा या केळी लोकसभेच्या रिंगणात उतले आहेत. यशवंत सिन्हा यांचे पुत्र व केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा हे हजारीबागमधून नशीब अजमावत असून झारखंडमध्ये रंगतदार लढती पहायला मिळणार आहेत.

राजस्थानमध्ये केंद्रीय राज्यमंत्री ऑलिम्पिक पदक विजेते कर्नल राज्यवर्धनसिंह राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसने कृष्णा पुनिया यांना उमेदवारी दिली असून पुनिया हेदेखील ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेते असल्याने लोकसभेचे मैदान कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य प्रदेशमधील टिकमगड, दमोह, खजुराहो, रेवा, सतना, होशंगाबाद आणि बेतूल या सातही मतदार संघांमध्ये भाजपचे खासदार आहेत. भाजपने सातपैकी पाच खासदारांना पुन्हा एकदा संधी दिली आहे, तर दोन मतदार संघांमध्ये नवे चेहरे आहेत.

पश्चिम बंगालमधील सात मतदार संघांत निवडणूक होत असून सातही जागा तृणमूल काँग्रेसच्या ताब्यात आहेत. बराकपूरमधून तृणमूल काँग्रेसचे नेते, माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी लढत देत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारणाच्या प्रयत्नात असणाऱया भाजपने तृणमूल काँग्रेसच्याच काही नेत्यांना फोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर आव्हान उभे राहिले आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 15, राजस्थानमधील 12, मध्य प्रदेश व पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 7, बिहार 5, झारखंड 4, जन्मू-कश्मीर आणि लडाखमधील प्रत्येकी एक जागांसाठी मतदान होत आहे. या 51 मतदार संघांपैकी 39 मतदार संघ भाजपच्या ताब्यात आहेत, तर तृणमूल काँग्रेसकडे 7 मतदार संघ आहेत. दोन मतदार संघांमध्ये काँग्रेसचे खासदार आहेत तर लोकजनशक्ती पार्टी, राष्ट्रीय लोकसमता पार्टी आणि पीपल्स डेमोक्रेटीक पार्टीकडे प्रत्येकी एक मतदार संघ आहे.