देशभरात पावसाचे थैमान, 125 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

देशातील पश्चिम भागापासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, केरळ राज्यातही पावसाने थैमान घातले असून यात 125 नागरिकांचा बळी गेला आहे.

यात केरळमध्ये आलेल्या पुरात अद्यापपर्यंत सर्वाधिक 55 जणांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातील पूरात 27 नागरिकांचा बळी गेला आहे. तसेच येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. यापार्श्वभूमीवर केरळ सरकारने लष्कराला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी बोटींना पोहोचण्यास विलंब होत आहे तेथील पूरग्रस्तांना एअरलिफ्ट करण्याचे आदेशही लष्कराला देण्यात आले आहेत.

दरम्यान केरळमध्ये गुरुवारी झालेल्या भूस्खलनात बेपत्ता झालेल्या 9 जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कर्नाटक दौऱ्यावर जाणार असून ते बेळगावधील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चिंताजनक पूरस्थिती

महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये चिंताजनक पूरस्थिती असून महाराष्ट्रातील पुरात 27, तर गुजरातमध्ये 22 जणांचा मृत्यू झाला आहे. पूरात अहमदाबाद आणि नाडीयाद येथे 8 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र आणि सांगलीमध्येही पूराने हजारो नागरिक बेघर झाले आहेत.