सगळ्या ‘फेक न्यूज’ काढून टाका! दिल्ली उच्च न्यायालयाचे गुगल, यूट्युबला आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या काढून टाकण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायलयाने गुगल आणि यूट्युबला दिले आहेत. बिग बी अमिताभ बच्चन यांची नात आराध्या बच्चन हिने तिच्याविषयी प्रसारित झालेली एक बातमी खोटी असल्याचं सांगत त्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर गुरुवारी न्यायमूर्ती सी. हरिशंकर यांच्या एकलपीठासमोर सुनावणी पार पडली. आराध्या हिच्या प्रकृतीविषयी एक व्हिडीओ युट्यूबवरील एका चॅनलने प्रसारित केला होता. तो व्हिडीओ खोटा असून आपल्या विरोधात ज्या माध्यम समूहाने खोटी बातमी प्रसारित केली आहे, त्या समूहावर कारवाई केली जावी आणि अशा खोट्या बातम्यांवर बंदी आणावी. कारण, आपण अद्याप अल्पवयीन असून या बातम्यांचा विपरित परिणाम आपल्यावर होत आहे, असं आराध्याने आपल्या याचिकेत म्हटलं होतं.

त्यावर सुनावणी करताना न्यायालय म्हणालं की, प्रत्येक मुलाला सन्मानाने जीवन जगण्याचा पूर्म अधिकार आहे. अशा परिस्थितीत यूट्युबची ही जबाबदारी आहे की त्यांनी अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर बंदी आणावी. तुमच्याकडे अशा प्रकारच्या बातम्यांना आळा घालण्यासाठी निश्चित धोरण का नाही? जर तुम्हाला अशा बातम्या यूट्युबवर प्रसारित होताना दिसत असतील तर त्यांना रोखण्यासाठीचं तंत्र असणं गरजेचं नाही का? तुम्ही जर एखाद्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत असाल, त्यावर प्रसारित होणाऱ्या आशयाबाबत तुमची जबाबदारी नाही का? याचा अर्थ तुम्ही (यूट्युब) फक्त लोकांना चुकीची माहिती पसरवण्यासाठी सोय उपलब्ध करून देत आहात, अशा शब्दांत न्यायालयाने युट्यूबची खरडपट्टी काढली.

तुम्ही एक असं व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात, ज्या माध्यमातून जनतेला भ्रामक माहिती मिळत आहे. हे सहन कसं काय केलं जाईल? तुम्ही हे व्यासपीठ दानधर्म म्हणून चालवत नाही. यातून शुद्ध नफा कमवत आहात. जर तुम्ही स्वतः या सगळ्यावर कारवाईचं धोरण बाळगून आहात, याचा अर्थ तुम्हालाही या त्रासाची संपूर्ण कल्पना आहे. जर असं असूनही फेक न्यूज प्रसारित होत असतील, तर तुमच्या या धोरणात दोष आहेत, अशा शब्दात खडेबोल सुनावत न्यायालयाने यूट्युब तसंच गुगलला प्रसारित होणाऱ्या खोट्या बातम्यांना हटवण्याचे आदेश दिले आहेत.