अॅसिड हल्ल्यातील गुन्हेगारांना दयामाया नकोच!-सर्वोच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
supreme_court

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

ऍसिडहल्ल्याचा गुन्हा हा रानटीपणाचा आणि हृदयशून्यतेचा असून अशा गुह्यातील दोषींना कुठलीही दयामाया दाखवली जाता कामा नये, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने एका 19 वर्षांच्या तरुणीवरील ऍसिडहल्ल्याच्या प्रकरणात दिला आहे.

या प्रकरणात पाच वर्षांचा तुरुंगवास आधीच भोगलेल्या दोन दोषी तरुणांनी प्रत्येकी दीड लाख रुपयांची अतिरिक्त भरपाई पीडित तरुणीला द्यावी, असा आदेश न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने दिला. पीडित तरुणीला हिमाचल प्रदेश सरकारनेही शासकीय योजनेखाली भरपाई द्यावी, असे निर्देशही न्यायालयाने यावेळी दिला.

2004 सालात संबंधित तरुणी कॉलेजला जात असताना दोषी तरुणांनी मोटारसायकलवरून येऊन तिच्यावर ऍसिड फेकले होते. त्यात ती तरुणी 16 टक्के भाजली होती. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणातील दोघा दोषी तरुणांना 10 वर्षांच्या तुरुंगवासासहित 5 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. दोषींनी त्या शिक्षेला आव्हान दिल्यानंतर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा पाच वर्षांनी कमी करून दंडाची रक्कम 25 हजार रुपयांपर्यंत वाढवली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.