
दिल्ली न्यायालयाने सोमवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना को-लोकेशन घोटाळ्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता त्यांची तिहार तुरुंगात रवानगी करण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी तुरुंगात घरातील अन्न आणि मास्क घेण्याची परवानगी मागितली, मात्र त्यांची हr विनंती न्यायालयाने नाकारली. यावेळी विशेष न्यायाधीश संजीव अग्रवाल म्हणाले की तुम्ही VIP नाही आहात. त्यामुळे कोणत्याही विशेष सुविधा दिल्या जाणार नाहीत. ते म्हणाले की जेलमधील अन्न मी देखील खाल्ले आहे, ते चांगले असते. VIP कैद्यांना सर्व काही हवे असते मात्र तुरुंगात प्रत्येक कैद्याला समान वागणूक मिळते. एखादी व्यक्ती खास आहे म्हणून तिच्याशी वेगळे वागण्याची गरज नाही, असे यावेळी ते म्हणाले. चित्रा रामकृष्ण यांना तुरुंगात चष्मा, प्रार्थना पुस्तक आणि औषधे घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सात दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यामुळे चित्रा रामकृष्ण यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सीबीआयने कोठडी अजून वाढवून मिळावी यासाठी आग्रह केला नाही. यावर न्यायालय म्हणाले की गेल्या तारखेला तुम्ही 14 दिवसांची कोठडी मागितली होती आणि आता तुम्ही 7 दिवसांच्या कोठडीबाबत समाधानी कसे आहात ? यावर सरकारी वकिलांनी सांगितले की त्यावेळी चित्रा रामकृष्ण या तपासात सहकार्य करत नव्हत्या आणि उत्तर देणं टाळत होत्या. यावर न्यायाधीशांनी विचारलं की मग आता न्यायालयीन कोठडीची तुम्हाला कशाला हवी आहे? चित्रा रामकृष्ण या सगळ्या प्रकाराच्या मास्टरमाईंड आहेत की या प्रकरणातील बोलाविता धनी कोणीतरी वेगळाच आहे ?यावर सरकारी वकिलांनी सांगितले की हे आताच सांगणे अवघड ठरेल.
चित्रा रामकृष्ण यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल करताच न्यायाधीश म्हणाले काही दिवसांपूर्वीच तुम्ही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, आता जामिनासाठीचा अर्ज हे थोडं लवकर होत नाहीये का ? हे म्हणत असतानाच न्यायाधीश म्हणाले की, अर्थात जामिनासाठी अर्ज करणे हा आरोपाचा अधिकार असून त्याबाबतचा निर्णय आरोपीलाच घ्यायचा असतो. या प्रकरणातील अन्य आरोपी आनंद सुब्रमण्यम याने दाखल केलेल्या जामिनाचा अर्जावर न्यायालय 24 मार्च रोजी आदेश देण्याची शक्यता आहे.

























































