
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्त कार्यालयात शुक्रवारी साजऱया झालेल्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमाला फुटीरतावादी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे हिंदुस्थानने त्या समारंभावर बहिष्कार टाकला होता. त्याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केली होती. पुलवामाच्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बहिष्काराचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानी जनतेला शुभेच्छा दिल्या.
मोदी यांचा तो शुभेच्छा संदेश पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘ट्विट’ केला आहे. आपल्या उपखंडातील वातावरण दहशतवाद आणि हिंसाचार यापासून मुक्त ठेवण्यासाठी लोकशाही, शांतता, प्रगती, भरभराटीसाठी या प्रांतातील जनतेला एकत्रितपणे झटावे लागेल असे मोदी यांनी त्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानी जनतेला पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे इम्रान खान यांनी स्वागत केले. कश्मीरसहीत दोन्ही राष्ट्रांमधील वादाचे सारे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांगीण चर्चा सुरू करण्याची वेळ आली आहे असे इम्रान खान यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
प्रेमपत्रे पाठवणे बंद करा-काँग्रेस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला प्रेमपत्रे पाठवण्याचे थांबवावे असा सल्ला काँग्रेसने पाकिस्तानी जनतेला मोदी यांनी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशानंतर दिला आहे. यूपीएचे सरकार केंद्रात असताना पाकिस्तानला प्रेमपत्रे पाठवत बसू नका असे सांगत मोदी हे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर टीकेची झोड उठवायचे. त्याची आठवण मोदी यांना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी करून दिली आहे. मोदी यांची पाकिस्तानविरोधात बळ दाखवण्याची भाषा फक्त मीडिया आणि देशातील जनतेला ऐकवण्यासाठी असते असा आरोपही सुरजेवाला यांनी केला आहे.

























































