तुमची 1 रुपया फी घेऊन जा- मृ्त्यूच्या एक तासाआधी स्वराज यांचा अॅड. साळवेंना फोन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

माजी परराष्ट्रमंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. स्वराज यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण देशच हळहळला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत देशसेवेचा विचार करणाऱ्या स्वराज यांनी मृत्यूच्या एक तासाआधी प्रख्यात वकील हरीश साळवे यांच्याशी संपर्क साधला होता. पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्याबद्दल त्यांनी साळवे यांच्याकडे चौकशी केली. तसेच या खटल्यासाठी आकारलेली 1 रुपये फी येऊन घेऊन जाण्यासही त्यांनी साळवे यांना सांगितले.

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) जाधवप्रकरणी हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व हरिश साळवे करित आहेत. या खटला लढण्यासाठी साळवे यांनी  1रुपये एवढी फी आकारली आहे. हीच फी देण्यासाठी स्वराज यांनी साळवे यांना फोन केला होता. यावेळी झालेले संभाषण खूपच भावनात्मक होते. त्याचदरम्यान स्वराज यांनी तुम्ही  मला येऊन भेटा. जो खटला तुम्ही जिंकला त्याची 1 रूपये फी द्यायची आहे. म्हणून उद्या सहा वाजता या असे स्वराज यांनी साळवे यांना सांगितले. यावर साळवे यांनीही ही मौल्यवान फी घेण्यासाठी मी येणारच असल्याचे स्वराज यांना सांगितल्याचे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

पाकिस्तानने जाधव यांना 2016 साली मार्च महिन्यात हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली आहे. पाकिस्तान जाधव यांना हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना भेटण्याची परवानगी देत नव्हता. येथील लष्कराच्या न्यायालयाने जाधव यांची कुठलीही बाजू न ऐकता त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. यास हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आवाहन दिले होते. त्यावर न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवरील स्थगिती कायम ठेवण्याचे व जाधव यांना हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना भेटू देण्याचे आदेशच पाकिस्तानला दिले. आयसीजेच्या या निर्णयावर स्वराज यांनी आनंद व्यक्त केला होता. हिंदुस्थानसाठी हा एक महत्वाचा विजय आहे, असे त्याने टि्वट केले होते. त्याचबरोबर जाधव प्रकरण आंतरराष्ठ्रीय न्यायालयात नेल्याबद्दल मोदींचेही स्वराज यांनी आभार मानले होते. तसेच खटला लढवल्याबद्दल साळवे यांचेही आभार मानले होते.