धक्कादायक! विद्यार्थिनीवर कात्रीने हल्ला करत पहिल्या मजल्यावरून फेकले, वर्गशिक्षिका पोलिसांच्या ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. करोलबाग परिसरातील फिल्मिस्तान येथे एका प्राथमिक शाळेतील शिक्षिकेने पाचवीच्या विद्यार्थिनीला कात्रीने मारून पहिल्या मजल्यावरून खाली फेकल्याचं वृत्त आहे. ही घटना मॉडेल बस्ती येथील महापालिकेच्या कन्या शाळेत घडली आहे.

शिक्षिकेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गीता देशवाल असे या शिक्षिकेचे नाव आहे. तसेच जखमी झालेल्या मुलीचे नाव वंदना असून तिच्यावर हिंदुराव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या प्रकृतीस धोका नसल्याचीही माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11.15 च्या सुमारास पीएस डीबीजी रोडच्या बीट ऑफिसरला एका व्यक्तीने या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यावेळी मुलीचे नातेवाईक शाळेबाहेर गोंधळ घालत होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिका गीता देशवाल हिला ताब्यात घेतले. शिक्षिकेने प्रथम वंदनाला कात्रीने जखमी केले व नंतर तिला पहिल्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

सदर घटनेत विद्यार्थिनीला तत्काळ रुग्णालयात नेल्याने आता तिची प्रकृती स्थिर आहे. तसेच सीटी स्कॅनसह सर्व आवश्यक चाचण्या करण्यात आल्या असून ती उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलीचा जबाब नोंदवून घेत पोलिसांनी शिक्षिकेला ताब्यात घेतले आहे. यावेळी विद्यार्थिनीने असेही सांगितले की, शिक्षिकेने माझे केस कापण्याचाही प्रयत्न केला होता. या क्रूर शिक्षिकेमुळे आता शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.