साध्वी प्रज्ञासिंह महान संत, मी मूर्ख प्राणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
uma-bharti

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

भोपाळमधून निवडणूक लढवणाऱया भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या आपल्या विधानांमुळे चर्चेत असताना आता मध्य प्रदेशच्या राजकारणातील दिग्गज नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना महान संत म्हणून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
मध्य प्रदेशच्या राजकारणात आता तुमची जागा साध्वी प्रज्ञासिंह घेणार का, असा प्रश्न पत्रकारांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना, साध्वी प्रज्ञासिंह या महान संत असून मी केवळ एक मूर्ख प्राणी आहे. माझी आणि त्यांची अजिबात स्तुती करू नका असे सांगत उमा भारती यांनी प्रज्ञासिंह यांची तोंड भरून स्तुती केली. दरम्यान, यापूर्वी भाजपने उमा भारती यांना रिंगणात उतरवून मध्य प्रदेशचे 10 वर्षांचे काँग्रेसचे सरकार उलथवून टाकले होते.

आठ महिन्यांतच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

उमा भारती मुख्यमंत्री बनल्या; परंतु त्यांना केवळ 8 महिन्यांतच राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर बाबूलाल गौर आणि शिवराजसिंह चौहान यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. सलग 15 वर्षे भाजपने मध्य प्रदेशामध्ये राज्य केले; परंतु काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. सध्या येथे कमलनाथ हे मुख्यमंत्री आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा एकदा काँग्रेसकडून सत्ता खेचण्याच्या दृष्टीने साध्वी प्रज्ञासिंह यांना मैदानात उतरवले आहे. हे लक्षात घेता उमा भारती यांनी साध्वी यांच्याबद्दल केलेले विधानही महत्त्वपूर्ण ठरले आहे.