
चिंचपूर इजदे प्राथमिक शाळेतील शिक्षिकेची झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी मंगळवारी दुसऱ्या दिवशीही शालेय व्यवस्थापन समिती व पालकांनी शाळा बंद ठेवत आंदोलन सुरूच ठेवले. येथील शाळेत तीन शिक्षक असून संच मान्यतेनंतर एक शिक्षिका अतिरिक्त झाल्या आहेत. पालकांनी मुलांना शाळेत येऊ न दिल्याने शाळेत शुकशुकाट होता.
अतिरिक्त झालेल्या शिक्षिकेचे इतरत्र समायोजन झाल्यानंतर पालक आक्रमक झाले असून शिक्षिकेची बदली तात्काळ रद्द करावी, या मागणीसाठी सोमवारी शाळेला कुलूप लावून आंदोलन सुरू केले. शिक्षण विभाग व पालक यांच्यात सोमवारी झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा निघू शकला नसल्याने पालकांनी मंगळवारीही शाळा बंद ठेवत आंदोलन सुरू ठेवले. शिक्षण विभाग व पालक यांच्यातील संवाद व्यवस्थित होऊ न शकल्याने दुसऱ्या दिवशीही शाळा बंद राहून शाळेतील 66 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
शिक्षिकेची बदली करू नये अशी पालक व ग्रामस्थांची मागणी होती. मात्र ती पूर्ण न झाल्याने सोमवारी शाळा बंद आंदोलन करण्यात आले. या प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी शिक्षण विभागाने केंद्रप्रमुखांना चर्चेसाठी बोलावले. मात्र बदली झालेल्या शिक्षकेला डेपुटेशनवर तात्पुरत्या स्वरूपात येथेच ठेवू, असे तोंडी आश्वासन केंद्रप्रमुखांनी पालकांना दिले.मात्र या आश्वासनावर विश्वास न ठेवता आम्हाला लेखी द्या, अशी मागणी पालकांनी केली. मात्र ती अमान्य करण्यात आल्याने दुसऱ्या दिवशी शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. हे आंदोलन लवकर न मिटल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकत असल्याने हे आंदोलन लवकर मिटावे, अशी अपेक्षा पालकांमधून होत आहे.




























































