राजापुरातील ब्रीटीश कालीन वखारीचे जतन करण्याची मागणी, माय राजापूर व शिवप्रेमींचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर शहराची ऐतिहासीक ओळख असलेल्या ब्रिटीशकालीन वखारीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी शिवप्रेमींकडून धडपड सुरू आहे. मात्र वखारीची जागा गृहविभागाच्या ताब्यात असल्याने वखारीच्या पुनरूज्जीवनामध्ये मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे सदरची जागा नगपरिषदेच्या ताब्यात मिळावी व या ठिकाणी शिवसृष्टी निर्माण करून हे एक पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हावे अशी मागणी माय राजापूर व राजापुरातील शिवप्रेमींकडून करण्यात आली आहे.

ब्रिटीशांच्या कालावधीत निर्माण झालेली राजापूरची वखार म्हणजे एकेकाळी राजापूरची शान होती. सुरूवातीपासूनच चालू-बंद असलेली ही वखार छत्रपती शिवाजी महाराजांनी येथून इंग्रजांचा बिमोड केल्यानंतर अल्पावधीतच बंद पडली. त्यानंतरही गेली अनेक वर्षे तिचे अस्तित्व दिसून येत होते. मात्र काळाच्या ओघात पुरातत्व विभागाचे याकडे झालेल्या दुर्लक्षतेमुळे ही वखार नामशेष झाली आहे. इंग्रजांनी बांधलेली ही वखार राजापुरात नेमकी कधी बांधली गेली, हे सांगता येणे कठीण असले तरी 1649 च्या दरम्याने ती सुरू झाल्याचे सांगण्यात येते.

मात्र ही वखार सुरू झाल्यापासून ती सातत्याने चालू-बंद अवस्थेत होती. त्यावेळी राजापूर व्यापारी पेठ असल्याने इंग्रज, पेंच, डच यांच्यातील सत्तासंघर्ष यामुळे कोकण किनारपट्टीवर सातत्याने अशांतता होती. सन 1661 मध्ये शिवाजी महाराजांच्या रोषाला बळी पडल्यानंतर ही वखार बंद पडल्याची नोंद आढळते. ही बंद पडलेली वखार पुन्हा 1668 मध्ये सुरू झाली. मात्र 1670 मध्ये पुन्हा एकदा शिवरायांच्या स्वारीमुळे बंद पडली होती.1702 मध्ये ती पुन्हा सुरू झाली. त्यानंतर 1770 च्या सुमारास ती बंद पडल्याचा कयास इतिहास तज्ञ व्यक्त करीत आहेत.

त्यानंतर मात्र ही राजापूरची वखार कायमची बंद झाली. शहरातील खडपेवाडी येथील असलेल्या या वखारीकडे पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने ही वखार नष्ट झाली आहे. वास्तविकता एक ऐतिहासीक ठेवा म्हणून या वास्तूचे जतन करणे गरजेचे होते. मात्र तसे न होता या वखारीला भुईसपाट करण्यात आले. ब्रिटीशांच्या कालावधीत ही वखार म्हणजे ब्रिटीशांचे कार्यालय होते. तसेच येथे अधिकारी वर्गाचे निवासस्थान होते. त्यामुळेच तेथे संरक्षणाचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे या वखारीत मालासमवेत गोळा, बारूद व तोफा देखील संचय करून ठेवला जात असे.

आयात नियार्तीच्या बाबतीत त्याकाळी अग्रेसर असलेल्या राजापूरात गेल्या काही दशकांमध्ये मोठा बदल घडला. सामान्य शहरे व्यापारात पुढे येत असताना राजापूर शहर मागे पडले ते कायमचेच. राजापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करणारा व्यापार काळाच्या पडद्याआड गेला. साहजिकच सुवर्णकालिन युगात केंद्रबिंदू ठरलेली वखार दुर्लक्षित गेली. कालांतराने दोन जागतिक महायुध्दांनंतर ब्रिटीशांची सत्ता अस्ताला गेली. ब्रिटीश देश सोडून गेले अन वखारीचे अस्तित्वच संपले. या वखारीमुळेच राजापूरला ऐतिहासिक व्यापारी केंद्र म्हणून मान्यता मिळाली होती. अशा या वास्तूचे त्यावेळी जतन झाले असते तर आज राजापूरच्या वैभवात अधिक भर पडली असती.

मात्र मागील काही वर्षांपासून शिवप्रेमींनी ब्रिटीशकालीन वखारीच्या पुनरूज्जीवनाचा प्रश्न हाती घेतला आहे. ऐतिहासीक ठेवा म्हणून वखारीचे पुनरूज्जीवन करताना या ठिकाणी शिवसृष्टी उभारण्याचा शिवप्रेमींचा मानस आहे. याकरीता माय राजापूर या संस्थेने आराखडाही तयार केला आहे. मात्र वखारीची जागा पोलीस खात्याच्या ताब्यात असल्याने हा प्रस्ताव रेंगाळला आहे. त्यामुळे ही जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळावी याकरीता आमदार, खासदार, पालकमंत्री यांना यापूर्वी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्यापही जागेचा पश्न सुटलेला नाही. वखारीची जागा नगरपरिषदेच्या ताब्यात मिळण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे माय राजापूर संस्थेचे प्रदीप कोळेकर, हिंदवी स्वराज्य पतिष्ठानचे अध्यक्ष महेश मयेकर यांनी दिली.