
दातांची कोणतीही समस्या असेल तर प्रत्येकजण डेंटिस्टकडे धाव घेतो. मात्र, ब्रिटनमधील 42 वर्षांच्या महिलेला दातांचा त्रास होऊ लागल्यावर तिने घरच्याघरीच यावर उपचार केला. घरी केलेले हे उपचार तिच्या अंगलट आले आहेत. या महिलेने डेंटिस्टकडे जाण्याऐवजी घरीच स्वतःच आपले 11 दात उखडले आहेत.
ब्रिटनच्या लंडनमधील डॅनियल वॉट्स नावाच्या महिलेने स्वतःचे 11 दात उखडले आहेत. दातांचा त्रास होत असल्याने तिने स्वतःच घरीच आपले दात काढले आहेत. खासगी डेंटिस्टची फी परवडणारी नसल्याने आपण घरच्याघरीच आपले दात उखडल्याचे तिने सांगितले. ‘मिरर यूके’ ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दातदुखीचा त्रास सुरू झाल्यावर ही महिला जवळच्या सरकारी रुग्णालयात गेली होती. तिथे डेंटिस्ट उपलब्ध नव्हते. तसेच खासगी डॉक्टरकडे जाण्याएवढे पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्यांची फी आपल्याला परवडणारी नसल्याने आपण खासगी डेंटिस्टकडे गेलोच नाही. आपण गेल्या तीन वर्षांच त्रास होणारे आपले 11 दात घरीच काढल्याचे डॅनियल यांनी सांगितले.
आपल्या हलाखीच्या परिस्थितीमुळे खासगी डॉक्टरकडे जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्रास होणारे 11 दात आपण घरीच काढले. मात्र, आता ते अंगलट आले असून आपल्याला प्रंचड वेदना होत आहेत. या वेदनांपेक्षा दातदुखी बरी होती, असे वाटायला लागले आहे. तीन वर्षांत 11 दात उखडल्याने आपण हसणेच विरसलो आहोत. तसेच आपला आत्मविश्वासही कमी झाला आहे. दररोज होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी आपल्याला पेनकिलर घ्यावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपल्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसल्याने आपल्याला घरीच दात काढावे लागले. हे खूप त्रासदायक होते. त्यातील काही दात हलण्यास सुरुवात झाली होती. तर काही दात किडले होते. त्यामुळे ते घरीच काढले. मात्र, त्या नाइलाजाने केलेल्या त्या धाडसी निर्णयाने आता रोज पेनकिलर घेण्याची वेळ आल्याचे डॅनियल यांनी सांगितले. या घटनेमुळे परदेशातील महागड्या आरोग्यसेवेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे.



























































