
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान हिंदुस्थानने पाकिस्तानसह चीन आणि तुर्कीचाही सामना केला, असे विधान उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी आज केले. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या पाठीशी चीन आणि तुर्कीचा हात असल्याचे समोर आले, असेही ते म्हणाले. दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
पश्चिम हिंदुस्थानच्या सीमेवर हिंदुस्थान एका शत्रूशी लढत होता; परंतु प्रत्यक्षात हिंदुस्थान तीन शत्रूंना तोंड देत होता. आपल्यासमोर सीमेवर पाकिस्तान होता; परंतु चीनकडून त्यांना मदत दिली जात होती, असे सिंह यांनी म्हटले आहे. चीनकडून पाकिस्तानला सर्वतोपरी मदत दिली जात होती. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण, गेल्या पाच वर्षांतील पाकिस्तानची लष्करी उपकरणे पाहिली तर त्यातील 81 टक्के चिनी बनावटीची शस्त्रs आहेत, असेही सिंह यांनी नमूद केले.
चीनसाठी हिंदुस्थान–पाकिस्तान संघर्ष प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा
हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षात चीनने आपल्या शस्त्रास्त्रांची चाचणी घेतली. चीनसाठी हिंदुस्थान-पाकिस्तान संघर्ष प्रयोगशाळेतील प्रयोगासारखा होता, असा आरोपही राहुल सिंह यांनी केला. शस्त्रविरामाबाबत जेव्हा डीजीएमओ स्तरावर चर्चा सुरू होती. तेव्हा पाकिस्तानला महत्त्वाच्या व्हेक्टर्सबद्दल आधीपासूनच माहिती होती. चीनकडून पाकिस्तानला वेळोवेळी ही माहिती पुरवली जात होती, असेही सिंह यांनी नमूद केले.
मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे चीन आणि पाकिस्तान एकत्र आल्याचा आरोप काँग्रेसने एक्सवरून केला आहे. हिंदुस्थानसाठी हे अत्यंत खतरनाक असून मोदी हे देशाच्या सुरक्षेत पूर्णपणे फेल झाल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी सातत्याने याबाबत संसदेतही सांगत आले आहेत. पाकिस्तान आणि चीनचे वाढत चाललेले संबंध हिंदुस्थानसाठी घातक आहे. याप्रकरणी संसदेत चर्चेचीही मागणी राहुल गांधी यांनी केली. परंतु, मदींनी त्याकडे दुर्लक्ष केले तसेच चीनवरही डोळे वटारू शकले नाहीत, असा हल्लाही काँग्रेसने केला आहे.