
पंतप्रधान मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाहीत, असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्हय़ांत का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत? आम्हीही असाच सवाल करायचा का? अशी विचारणा करताना गतवर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करीत आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. नुकसानीचे पंचनामे कधी करणार, मदत कधी मिळणार असेही त्यांनी विचारले.
फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या दोघांनीही आज देवगड, मालवण येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, ही पाहणी सुरू असतानाच फडणवीस यांनी दौरा अर्धवट सोडला आणि ते तातडीने गोवामार्गे दिल्लीला रवाना झाले. त्यामुळे नंतर जिल्हय़ात उलटसुलट राजकीय चर्चा सुरू होती.




























































