
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे राजीनामा देण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. देशमुख यांनी खरतर या आधीच राजीनामा द्यायला हवा होता, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
गृहमंत्र्यावर चौकशी होत असेल तर त्या व्यक्तीला त्या पदावर राहता येत नाही. त्यामुळे देशमुख यांच्याकडे राजीमाना देण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून त्यांनी राजीनामा दिला. उच्च न्यायालयाने सीबीआय मार्फत चौकशीचे आदेश दिल्याने गृहमंत्री पदावर राहणे मला नैतिकदृष्टय़ा योग्य वाटत नाही, असे देशमुख आज सांगत आहेत. पण या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का? हा प्रश्न विचारावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.
सत्य काय ते बाहेर येईल
ज्या प्रकारे संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर तसेच आधी पोलिसांचा जो व्यवहार दिसतोय, त्याकडे पाहूनच उच्च न्यायालयाने देशमुखांचे प्रकरण हे सीबीआयकडे दिले आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, या चौकशीतून सत्य काय ते बाहेर येईल, असे फडणवीस म्हणाले.





























































