
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आयआयटीसारख्या नामांकित संस्थेची मदत घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. दरवर्षी निर्माण होणारी खड्डय़ांची समस्या दूर करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना महापालिकेला दिल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील रस्त्यांवरील खड्डय़ांबाबत आमदार संतोष दानवे यांनी प्रश्नोत्तराच्या तासांत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी या वर्षी साडेनऊ कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेने खड्डे बुजविण्यासाठी विशिष्ट रसायने वापरून नवीन पद्धतीचे मिश्रण तयार केले आहे. ते पावसातदेखील वापरता येते. बुजविलेले खड्डे पावसाळय़ात तग धरू शकतील अशा शीत डांबरमिश्रित खडीची चाचणी घेण्यात आली आहे. या खडीचे उत्पादन महापालिकेच्या मालकीच्या अस्फाल्ट संयंत्रातून करण्याकरिता त्यात योग्य असे बदल करण्यात आले आहेत असेही त्यांनी सांगितले.
























































