
देवगड पवनचक्की येथील सर्वात मोठी कोस्टल झिप लाईन म्हणून ओळखली जाणारी झिपलाईन अखेर शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास कोसळले. यावेळी काही पर्यटक झिपलाईनचा आनंद घेत असताना हा प्रकार घडला. यात दोन पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
देवगड पवनचक्की येथील झिप लाईनचा आनंद घेण्यासाठी मुंबई येथील पर्यटक येत असतात. शनिवारी पवनचक्की येथून झिपलाईनने जात असताना मध्यभागी गेल्यावर झिपलाईनचा रोपवे अचानक तुटला. प्रतीक विष्णू कुडाळकर (32) व अद्वैत प्रशांत उत्तेकर (5 ) हे दोघेही खाली वाळूवर कोसळले. प्रतीक कुडाळकर यांच्या हाताला व कमरेला गंभीर दुखापत झाली तर अद्वैत उत्तेकर याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आली. नंतर त्यांना अधिक उपचारासाठी पुढे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळता देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस राजन जाधव फकृदिन आगा यांनी घटनास्थळी जात घटनेची माहिती घेतली मात्र रुग्णांची दुखापत गंभीर असल्यामुळे पोलीस येण्या अगोदरच रुग्णांना अधिक उपचारासाठी पुढे हलविण्यात आले.



























































