व्हँकुव्हरला चुकीचे विमान पाठवले, डीजीसीएचा एअर इंडियाला दणका; एक अधिकारी निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हँकुव्हरला चुकीचे विमान पाठवल्याने नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) निष्काळजीपणाबाबत एअर इंडियाला फटकारले आहे. या मार्गासाठी केवळ बोईंग 777-300ER विमानालाच मंजुरी असताना एअर इंडियाने चुकून व्हँकुव्हरच्या उड्डाणासाठी बोईंग 777-200LR विमान पाठवले. परिणामी, सुमारे सात तासांच्या प्रवासानंतर विमान दिल्लीला परतले.

या घटनेनंतर डीजीसीएने तात्काळ एअर इंडियाला सुधारणात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले. या निष्काळजीपणाबद्दल एअरलाइनच्या एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय मार्गासाठी त्यांचा पल्ला, सुरक्षा मानके आणि नियामक मंजुरीच्या आधारावर वेगवेगळी विमाने मंजूर केली जातात. अशा परिस्थितीत, चुकीचे विमान पाठवणे हे केवळ नियमांचे उल्लंघनच नाही, तर त्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो आणि प्रवाशांचा वेळ व संसाधने वाया जाऊ शकतात. अशा घटनांमुळे एअरलाइनच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

बोईंग 777-200LR आणि बोईंग 777-300ER ही दोन्ही बोईंग 777 सिरीजमधील विमाने आहेत. 777-300ER हे मोठे आणि लांब असल्यामुळे त्यात 350-400 प्रवासी बसू शकतात, तर 777-200LR हे तुलनेने लहान असून त्यात केवळ अंदाजे 250-300 प्रवासी बसू शकतात. अंतराच्या बाबतीत 777-200LR हे विमान जास्त अंतर कापू शकते, तर 777-300ER चा पल्ला थोडा कमी असला तरी जास्त प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेमुळे ते व्यावसायिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य मानले जाते.