उत्कृष्ट कामगिरी असूनही यूपीएससीने महासंचालक पदासाठी शिफारस केली नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्कृष्ट कामगिरी व प्रशंसनीय रेकॉर्ड असतानाही यूपीएससीच्या निवड समितीने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. एवढेच काय तर उल्लेखनीय एसीआर (सेवा पुस्तिका) असतानाही महासंचालक पदासाठी यूपीएससीने आपल्या नावाची शिफारसच केली नाही असा जोरदार युक्तिवाद प्रभारी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला. दरम्यान न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला.

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून एप्रिल 2021 पासून त्यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र, पांडे यांच्या नियुक्तीला अॅड. दत्ता माने यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

पांडे यांच्या वतीने ज्येष्ठ काऊन्सिल नवरोज सिरवाई यांनी खंडपीठाला सांगितले की, पांडे यांनी आयुष्यातील 30 वर्षे पोलीस सेवेसाठी दिली आहेत. ते अत्यंत सचोटीचे अधिकारी असून नोव्हेंबर 2021 पासून प्रत्येक सेवा पुस्तिकेत आठ व त्याहून अधिक श्रेणी मिळवली आहे. ही उल्लेखनीय बाब असतानाही यूपीएससीच्या तीनपैकी दोन निवड समिती सदस्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या प्रकरणात पांडे सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.