
अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
बाबासाहेबांनी आपल्या लाखो अनुयायांना नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर चंद्रपूर येथेही आपल्या अनुयायांना दीक्षा दिली. म्हणूनच बाबासाहेबांच्या परिवर्तन चळवळीच्या इतिहासात चंद्रपूरला एक महत्वाचे स्थान आहे. 16 आणि 17 ऑक्टोबर ला त्यांचे वास्तव्य येथे होते. बाबासाहेब आंबेडकर आणि चंद्रपूर यांच्या नात्याबाबतच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.
बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी याकरिता नागपूर शहराची निवड केली होती. बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या आग्रहाच्या विनंतीमुळे त्यांनी 16 ऑक्टोबरला चंद्रपूरला येण्याचे मान्य केले होते. 16 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब नागपूरच्या श्याम हॉटेल येथून सकाळी पाच वाजता निघाले. त्यांच्या सोबत माईसाहेब, त्यांचे भाऊ कबीर, सेवक नानकचंद रत्तू होते. हे सर्व खासगी मोटारीने चंद्रपूरच्या दिशेने निघाले. उमरेड, भिवापूर, नागभीड, मूल आणि चंद्रपूर असा हा प्रवास होता. मात्र, रस्ता कच्चा आणि खडतर असल्याने बाबाहेबांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता.
बाबासाहेबांचे मूल येथे स्वागत करण्याकरिता बॅरि. खोब्रागडे यांचे वडील देवाजी भिवाजी खोब्रागडे आणि जनार्दन संत गुरुजी हे अगोदरच येथे पोहोचले होते. बाबासाहेबांची येथील शासकीय विश्रामगृहात व्यवस्था केली होती. बाबासोहब जेव्हा इथे आले तेव्हा प्रवासादरम्यान ते फार थकलेले जाणवत होते. यादरम्यान त्यांनी काही खाल्ले नव्हते. त्यांनी खाण्याकरिता चटणी- भाकरीची मागणी केली. पिसाबाई गोवर्धन यांच्या घरून त्वरित चटणी भाकर आणून देण्यात आली. बाबासाहेबांनी ती आवडीने खाल्ली. यानंतर काही वेळाकरिता विश्रांती घेतल्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास बाबासाहेबांनी चंद्रपूरकडे प्रस्थान केले.
चंद्रपूरला आजच्या दीक्षाभूमी परिसरात लाखोंचा जनसमुदाय बाबासाहेबांची आतुरतेने वाट बघत होता. यवतमाळ, वणी, वर्धा तसेच आंध्र प्रदेशातील आदिलाबाद जिल्ह्यातील बाबासाहेबांना मानणारा समाज लाखोंच्या संख्येने जमला होता. हातात दोन दिवसांची शिदोरी घेऊन आपल्या कुटुंबासह शेकडो मैलांचा प्रवास करीत येथे नागरीक पोहोचले होते. दीक्षाभूमी परिसरात सोहळ्याकरिता भव्य दोन मजली मंच सुसज्ज होता. व्यासपीठावर उंच टेबलावर भगवान बुद्धाची प्रतिमा ठेवण्यात आली होती. देवाजी भिवाजी खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत समिती तयार करण्यात आली. बाबासाहेबांना सलामी देण्याकरिता समता सैनिक दल जिल्हा शाखेचे मुख्य चीफ कमांडर पुंडलिक बालाजी देव, उपकमांडर राजाराम रामटेके, शहरप्रमुख रामदास रायपुरे यांच्या नेतृत्वात सर्व चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाबासाहेबांचे सर्किट हाउस येथे आगमन होताच त्यांना समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात आली. थोडा वेळ आराम केल्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी दीक्षाभूमीकडे प्रस्थान केले. त्यांचे सेवक नानकचंद रत्तू यांच्या मदतीने बाबासाहेब व्यासपीठावर आले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने सारा परिसर दुमदुमत होता. त्यांनी सर्वांना हात जोडण्यास सांगितले. त्यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील आणि धम्मदीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी सांगितलेल्या 22 प्रतिज्ञा वाचण्यात आल्या. यानंतर बाबासाहेब खुर्चीवर बसले. त्यांनी जनसमुदायाला संबोधित करावे, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, बाबासाहेबांची प्रकृती बरी नव्हती. पाठीच्या मणक्याच्या दुखण्यामुळे त्यांना कमालीच्या वेदना होत होत्या. मधुमेहाचा त्रासही वाढला होता. त्यांना विश्रांतीची गरज होती. बाबासाहेब मंचावरून खाली उतरले. ते सर्किट हाउसमध्ये गेले.
बाबासाहेबांनी दिलेला संदेश
17 ऑक्टोबरला सकाळी सर्किट हाउस येथे बाबासाहेबांना बघण्याकरिता गर्दी उसळली होती. त्याच दिवशी ते नागपूरहून दिल्लीला जाणार होते. बाबासाहेबांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी सर्वांची उत्कट इच्छा होती. बाबासाहेबही हे जाणून होते. वऱ्हांड्यात खुर्चीवर बाबासाहेब बसलेले होते. आणि त्यांनी उपस्थितांना उद्देशून म्हटले की,
“तुमच्याकरिता मी जे करू शकत होतो ते मी करून ठेवले आहे. आता पूर्वीचे जगणे सोडून द्या. आपल्या मुलामुलींना खूप शिकवा. नवरा जर दारू पित असेल तर त्याला घरात पाऊल ठेवू देऊ नका. आपल्या दरिद्रीपणाचे प्रदर्शन करू नका. नीटनेटके आणि स्वच्छ रहा. आपले फाटके कपडे असल्यास ते विहिरीवर न धुता नदी, नाल्यावर धुवा.”
ते पुढे म्हणाले की,”आता तुम्ही बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. याचे सक्तीने पालन करा. ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ हा ग्रंथ मी तयार केला आहे. हा ग्रंथ कुठल्याही धर्मग्रंथाच्या तोडीचा आहे. त्यामुळे याचे नियमित वाचन करा. गाववस्तीत बौद्ध विहार तयार करून त्यात दर रविवारी एकत्र या”
अस्पृश्य समाजाकरिता आपले सर्व आयुष्य वेचणाऱ्या या महामानवाला पाहूनच अनेकांचे हुंदके अनावर झाले. हे पाहून बाबासाहेबांच्या पापण्याही ओलावल्या. यानंतर बाबासाहेब रेल्वेने चंद्रपूरहून नागपूरला गेले. बाबासाहेब आंबेडकर 2 दिवस चंद्रपुरात होते, मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चंद्रपुरात तेव्हापासून आजपर्यंत 15 आणि 16 ऑक्टोबरला दीक्षाभूमीवर लाखोंचा जनसागर उसळतो, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन म्हणून तो साजरा केला जातो.





















































