
सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात समलैंगिक विवाहाविषयी ऐतिहासिक निर्णय दिला. त्या निर्णयाची चर्चा सर्वत्र आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विवाह समानतेविषयी आपल्या निर्णयावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे. वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या एका परिषदेत ते बोलत होते.
या परिषदेचा विषय हिंदुस्थान आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयांचे दृष्टिकोन हा होता. या परिषदेत बोलताना चंदचूड म्हणाले की, मला असं वाटतं की आपलं मत आपल्या अंतःकरणातून तयार होतं. ते कधी कधी संविधानाच्या बाजूने असतं तर कधी कधी विषयाच्या. पण, मी या विषयी जे मत बनवलं आहे, जो निर्णय घेतला आहे, त्यावर मी ठाम आहे, असं चंद्रचूड यावेळी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देता येणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला होता. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एस. के. कौल या दोघांनीही समलैंगिक संबंधांना मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. पण, पाच सदस्यीय समितीत वेगळा निर्णय घ्यावा लागला होता. मात्र, आपण समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळावी या मताचा असल्याचं मत चंद्रचूड यांनी यावेळी व्यक्त केलं.
























































