धारावीत केवळ 166 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण; 2,359 पैकी 1,952 रुग्ण कोरोनामुक्त

574

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने उघडलेल्या मोहिमेत धारावीने मुसंडी मारली असून धारावीत आता केवळ 166 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर कोरोना रुग्णालय आणि केंद्रांवर उपचार सुरू आहेत. धारावीत आतापर्यंत 2,359 कोरोनाचे रुग्ण आढळले असून त्यापैकी 1,952 कोरोनामुक्त झाले आहेत तर 82 जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा दाटीवाटीच्या वस्ती, झोपडपट्टी यांना बसला. वरळी कोळीवाडा आणि धारावी या काही दाटीवाटीच्या आणि अधिक लोकसंख्या असलेल्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव सगळ्यात जास्त वेगाने झाला. मात्र, पालिकेने कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन कोरोना सेंटर्स आणि पूर्णपणे कोरोनासाठी फिल्ड हॉस्पिटल उभारली. त्याच्या बरोबरीनेच कोरोना रुग्ण शोधण्यासाठी कोरोना टेस्ट, मोबाईल व्हॅन तपासणी, फिव्हर क्लिनिक, आयसोलेशन आणि कोरेंटाईन करणे यासारख्या उपाययोजना सुरू केल्या.

‘मिशन धारावी’चे केंद्राकडून कौतुक

वरळीच्या तुलनेत धारावीची लोकसंख्या अधिक तर आहेच पण अधिक दाटीवाटीची असल्यामुळे धारावीतील संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने ‘मिशन धारावी’ ही विशेष हाती घेतली आणि तिच्या तितक्याच तातडीने आणि जोरदारपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे मुंबईतील इतर भागांच्या तुलनेत आता धारावीत संसर्ग होण्याचा कालावधी 141 दिवसांवर तर गेलाच आहे पण दररोज सापडणाऱ्या रुग्णांची आकडेवारीही 10 ते 2 या दरम्यान येऊ लागली आहे. त्याचबरोबर धारावीतील राजीव गांधी क्रीडा संकुल आणि एका पालिका शाळेत सुरू करण्यात आलेले कोरोना केंद्र बंद करण्यात आले आहे. धारावीच्या कामगिरीची केंद्र सरकारकडून दखल घेतली असून मुंबई पालिकेचे कौतुकही केले.

आपली प्रतिक्रिया द्या