
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा विकास येथील जनतेला विश्वासात घेऊनच झाला पाहिजे तसेच संक्रमण शिबिरेही धारावीतच असली पाहिजेत, अशी मागणी माजी आमदार आणि धारावी बचाव आंदोलनाचे प्रमुख निमंत्रक बाबूराव माने यांनी केली आहे. धारावीतील 50 पेक्षा अधिक संघटना तसेच राजकीय पक्षांचे नेते एकत्र आले आहेत. पक्षभेद विसरून धारावीची जनता एकत्र येत आहे आणि फसवणुकीचा प्रयत्न सरकार किंवा विकासक अदानी यांनी केला तर आक्रमक आंदोलन केले जाईल, असा खणखणीत इशारा बाबूराव माने यांनी दिला आहे.
धारावीच्या विकासाचे पंत्राट ज्या अदानी पंपनीला दिले गेले आहे, ती पंपनी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील आहे. त्यामुळे संपूर्ण धारावीचा विकास होईल की नाही, अशी भीती धारावीच्या जनतेत निर्माण झाली आहे. धारावीतील झोपडय़ांचे दोन-तीन वेळा सर्व्हे करण्यात आले, पण ते अतिशय चुकीचे आणि फसवे आहेत. धारावीचा सर्व्हे योग्य प्रकारे झालेला नाही. प्रत्यक्षात एक लाखापेक्षा झोपडय़ा आहेत. त्यामुळे अर्ध्या धारावीचाच विकास होणार की काय आणि बाकीचा भूखंड अदानीच्या घशातच जाणार काय, असा सवाल माने यांनी विचारला आहे.
गेली 30 वर्षे धारावीचा पुनर्विकास रखडला आहे. आता सरकारने निवडणुकीवर डोळा ठेवून तसेच अदानीच्या भल्यासाठी धारावीच्या विकासाची घोषणा केली आहे. धारावीच्या जनतेला तसेच विविध सामाजिक संघटनांना एकत्र करून कृती समिती स्थापन केली जात आहे. पक्षभेद विसरून धारावीची जनता एकत्र येत आहे. धारावीतील व्यापारी, छोटे उद्योजक, विविध एनजीओ आणि सामाजिक संघटनादेखील एकवटल्या असून सर्वांना विश्वासात घेऊनच धारावीचा विकास झाला पाहिजे, असेही माने यांनी सांगितले.
आम्हाला बेघर कराल तर याद राखा
धारावीतील विविध राजकीय पक्षांच्या कृती समितीला विश्वासात घेऊन तसेच म्हाडा, सिडको, महापालिका आणि एनजीओच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन धारावीचा विकास झाला पाहिजे. विकासाच्या नावाखाली धारावीतील जनतेला बेघर करण्याचा प्रयत्न झाला तर धारावीची गोरगरीब कष्टकरी जनता पेटून उठेल, असा इशारा माने यांनी आंदोलकांच्या वतीने दिला आहे.
























































