
धारावी ही केवळ राहण्याची जागा नाही, तर आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे तेथील उद्योगांना तिथेच वसवून त्यांना संघटित क्षेत्रात आणले जाईल. पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन धारावीतच केले जाईल. 2011 नंतरच्या अपात्र झोपडीधारकांना विशेष बाब म्हणून चांगली घरे दिली जातील आणि 12 वर्षानंतर ही घरे त्यांच्या नावावर होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ड्रग्ज प्रकरणात सापडला तर अधिकारी असू दे, नाहीतर अंमलदार त्या पोलिसाला बडतर्फ केले जाईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. विधानसभेत विरोधी पक्षाच्या वतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले.
मुंबईत 330 किमी लांबीचे मेट्रोचे जाळे
मुंबईत 330 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे जाळे आपण तयार करत आहोत. मुंबई महानगर परिसरात एकूण 14 मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी मेट्रो 3 चा प्रकल्प हा येत्या ऑक्टोबर महिन्यात पूर्णपणे कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. उत्तन ते विरार सागरी सेतूचा प्रस्ताव जायका पंपनीला सादर केला आहे. त्यामुळे विरारपासून कुलाब्यापर्यंत एक मोठा महामार्ग तयार होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
मुंबई महाराष्ट्राचीच
मुंबईला महाराष्ट्रापासून कुणी तोडू शकत नाही. कुणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, आजा आला तरीही हजारो पिढय़ा मुंबई ही महाराष्ट्राची राहील. महाराष्ट्रात मराठी माणसाचाचा आवाज बुलंद राहील, असे ते म्हणाले.
लोकल ट्रेन वातानुकूलित होणार… तिकीटही तेवढेच राहणार
मुंबईतील रेल्वे अपघातांची संख्या आणि मुंबईकरांना उपनगरीय गाडय़ांमधून प्रवास करताना होणाऱया यातना लक्षात घेता उपनगरीय रेल्वेला मेट्रोसारखे बंद दरवाजा असलेले वातानुकूलित डबे द्यावे, अशी मागणी आपण केली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून स्वतः रेल्वेमंत्री मुंबईत येऊन तशी घोषणा करणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईत वातानुकूलित उपनगरीय रेल्वे धावू लागली तरी त्यात कोणतीही तिकीटवाढ होणार नाही, असा निर्वाळा फडणवीस यांनी दिला.
तेरा पोलीस बडतर्फ
विरोधी सदस्यांनी केलेल्या भाषणात राज्यातील अंमली पदार्थांच्या विक्रीच्या चढत्या आलेखावरून सरकारवर टीका केली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनीही ड्रग्जच्या वाढत्या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. या विरोधात कडक कारवाई करण्यात येते आहे. ड्रग्ज प्रकरणात आरोपींसोबत मिलिभगत सापडल्यास अधिकारी असोत नाहीतर अमलदार त्या पोलिसाला निलंबित नव्हे बडतर्फ करण्याची कठोर भूमिका घेतली आहे. आतापर्यंत तेरा पोलिसांना बडतर्फ करण्यात आले आहे. अमली पदार्थांच्या व्यवसायात वारंवार सापडणाऱ्यांना मकोका लावण्यासाठी कायद्यात बदल केल्याचे त्यांनी सांगितले.