धारावीत सोमवारपासून झोपड्यांचे सर्वेक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धारावी पुनर्विकास प्रकल्प राज्य सरकारने अदानीच्या घशात घातल्यानंतर आता धारावीत सर्वेक्षणाच्या हालचालींना वेग आला आहे. धारावीतील रहिवाशांकडून माहिती गोळा करण्यासाठी 18 मार्चपासून सर्वेक्षण सुरू करण्यात येणार आहे. माटुंगा पूर्व रेल्वेलगतच्या भागातील कमला रमण नगर येथून सर्वेक्षणाला सुरुवात होईल, अशी माहिती धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडतर्फे सोमवारी देण्यात आली आहे.

धारावीतच पुनर्वसन झाले पाहिजे, प्रत्येक झोपडीधाकाला 500 चौरस फुटांचे घर मिळाले पाहिजे, अशी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासह स्थानिकांची मागणी आहे. मात्र धारावीकरांची 350 चौरस फुटांचे घर देऊन बोळवण करण्याचा अदानीचा प्रयत्न आहे. त्याविरोधात आधीच संतापाची लाट असून सर्वेक्षणाचा घाट घातला गेल्याने विरोध आणखी तीव्र होणार आहे.

डिजिटल पद्धतीने डेटा गोळा करणार
डीआरपीएलमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रत्येक झोपडीला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येईल. संपूर्ण गल्ल्यांचे लेझर मॅपिंग आणि प्रत्येक झोपडीचे व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात येणार आहे. प्रशिक्षित टीम स्वदेशी बनावटीच्या अॅपद्वारे रहिवाशांचा डेटा गोळा करण्यात येणार आहे.