बीडीडी, धारावी पुनर्विकासात गिरणी कामगारांना घरे द्या! भारतमाता येथे धरणे आंदोलनात मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडीडी चाळी तसेच धारावी पुनर्विकासात गिरणी कामगारांना घरे द्या, एनटीसीच्या बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर कामगारांसाठी घरे बांधण्यात यावी, खासगी गिरण्यांच्या धोकादायक चाळींच्या पुनर्बांधणीचे काम त्वरित हाती घ्यावे अशा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेकडो गिरणी कामगारांतर्फे बुधवारी लालबाग, भारतमाता येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ‘घरे आमच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

सध्या म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगार आणि वारसांची घरांसाठी पात्रता निश्चिती करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, पण गिरणी कामगारांना प्रत्यक्षात घरे कधी मिळणार? याचा जाब सरकारला विचारण्यासाठी गिरणी कामगार कृती संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे, गिरणी कामगार म्हणून एक जरी पुरावा सापडला तरी त्या कामगाराला पात्र केलेच पाहिजे या मागण्यादेखील यावेळी करण्यात आल्या.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते-आमदार सचिन अहिर, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, खजिनदार निवृत्ती देसाई, सरचिटणीस गोविंदराव मोहिते, रयतराज कामगार संघटनेच्या प्रमुख जयश्री खाडिलकर-पांडे, महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे, चिटणीस बबन गावडे, सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे अध्यक्ष नंदू पारकर, सरचिटणीस जितेंद्र राणे, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर व सेक्रेटरी शिवाजी काळे आदी कामगार नेत्यांनी यावेळी गिरणी कामगारांना मार्गदर्शन केले.