
इंडियन प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 15व्या हंगामाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. सध्याच्या 8 फ्रेंचायझींना संघात कायम ठेवणार असलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत मंगळवारी संपली. महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या खेळाडूंसह आणखी काही प्रमुख खेळाडूंना फ्रेंचायझींनी अपेक्षेप्रमाणे आपापल्या संघात कायम ठेवले आहे. मात्र, राशिद खान, पांडय़ा बंधू, शुभमन गिल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, इयॉन मॉर्गन आदी स्टार खेळाडूंना फ्रेंचायझींनी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार लोकेश राहुल व सनरायझर्स हैदराबादचा जॉनी बेअरस्टॉ यांनी आपापल्या संघांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी आयपीएलसाठी या दोन स्टार खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी फ्रेंचायझींमध्ये चढाओढ रंगणार आहे. राजस्थान रॉयल्सने बेन स्टोक्स व जोफ्रा आर्चर या स्टार खेळाडूंना रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
रिटेन केलेले खेळाडू
- चेन्नई सुपर किंग्जः महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा, ऋतुराज गायकवाड, मोईन अली.
- कोलकाता नाइट रायडर्सः सुनील नरिन, आंद्रे रस्सेल, वरुण चक्रवर्ती, व्यंकटेश अय्यर.
- सनरायझर्स हैदराबादः केन विल्यम्सन, अब्दुल समद, उमरान मलिक.
- मुंबई इंडियन्सः रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, कायरॉन पोलार्ड.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूः विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज.
- दिल्ली कॅपिटल्सः रिषभ पंत, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, ऍनरिच नॉर्तजे.
- राजस्थान रॉयल्सः संजू सॅमसन, जोस बटलर, यशस्वी जैस्वाल.
- पंजाब किंग्जः मयंक अग्रवाल, हर्शदीप सिंह.



























































