
सामना प्रतिनिधी । धुळे
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथील मयूर सिसोदे या तरुणाच्या हत्येला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरीदेखील स्थानिक पोलिसांना कुठलाही मागमुस लागलेला नाही. गेल्या चार महिन्यांत नरडाण्यात तीन जणांची हत्या झाली. त्यापैकी एकाचाही तपास लागू शकलेला नाही. स्थानिक पोलीस निष्क्रीय आहेत असे म्हणत नरडाण्यातील ग्रामस्थांनी तसेच राजकीय आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी बंद पुकारला. पोलीस ठाण्यावर सुमारे तीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान बंदला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवांमधील औषधी विकणाऱया दुकानांशिवाय इतर सर्व दुकाने बंद होती.
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे गेल्या चार महिन्यांत तीन जणांची हत्या झाली. नरडाण्यातील नंदकृष्णा केमिकल्समध्ये पहारेकरी म्हणून मयूर सिसोदे हा तरुण काम करीत होता. कामावर असताना 9 जूनला रात्री मयूरची हत्या करण्यात आली. त्यानंतर हत्या करणाऱयांनी त्याचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न केला. या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला, पण स्थानिक पोलिसांना हत्या करणाऱयांचा शोध घेता आलेला नाही. यापूर्वी नरडाण्यातील महादेव मंदिराजवळ राहणाऱया लक्ष्मीबाई जगताप नावाच्या महिलेचा गळा आवळून खून झाला. तत्पूर्वी गावात राहणाऱया हुसनोद्दीन शेख या व्यक्तीचे तारेने हातपाय बांधण्यात आले. तसेच त्याच्या अंगावर दोर बांधून दगड बांधण्यात आला आणि त्याला मेलाने रस्त्यावरील एका विहिरीत फेकून देण्यात आले होते.
चोऱया, मारहाणी, दरोडे आणि आता थेट हत्यांचे सत्र सुरू झाले. यामुळे नरडाण्यातील ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्व राजकीय पक्ष, संघटना आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन पोलीस यंत्रणेवर रोष व्यक्त केला. जिल्हा पोलीसप्रमुखांना निवेदन देऊन बुधवारी चर्चा घडवावी, अशी विनंती दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु चर्चेसाठी जिल्हा पोलीसप्रमुख किंवा पोलीस उपअधीक्षक नरडाण्यात आलेच नाहीत. त्यामुळे नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक उपनिरीक्षक योगेश राजगुरू आणि त्यांच्या सहकाऱयांवर नागरिकांनी रोष व्यक्त केला.
सर्वसाधारणपणे हत्या केल्यानंतर हत्या करणारे पळून जातात. पण मयूर सिसोदेची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न झाला आहे. आजवर अनेक गुह्यांचा छडा लावला, पण हत्या केल्यानंतर पुरण्याचा प्रयत्न झाला हे मी पहिल्यांदाच पाहातो आहे. त्यामुळे पोलीस तपासात गुंता जास्त वाढला आहे. पण उद्या सायंकाळी 5 पर्यंत ग्रामस्थांना समाधानकारक माहिती दिली जाईल, असे आश्वासन बुधवंत यांनी दिले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थ पोलीस ठाण्यापासून दूर गेले.
पोलीस निरीक्षकांनी केली ग्रामस्थांशी चर्चा
गावात बंद पुकारण्यात आला. मोठा जमाव पोलीस ठाण्यावर पोहोचला. सुमारे तीन तास पोलीस ठाण्याला ग्रामस्थांनी घेरले. अखेरीस शिरपूर येथील पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत नरडाण्यात पोहोचले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला.


























































