एसटी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी होणार ‘गोड’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
st bus
फाईल फोटो

सामना प्रतिनिधी । पुणे

कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात १ एप्रिल २०१६ रोजी करण्यात आलेल्या सुधारित वेतनवाढीनंतर कर्मचाऱ्यांचे पगार वाढले. परंतु तरीदेखील १ जून २०१८पर्यंत त्यांना जुनेच वेतन हाती मिळत होते. अशा सर्व कर्मचाऱ्यांना वेतनवाढीतील फरकाची रक्कम ही एकरकमी दिवाळीपर्यंत मिळणार असल्याची घोषणा शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली.

एसटी महामंडळाच्या वतीने आंतरविभागीय नाट्य स्पर्धेच्या अंतिम पेâरीचे उद्घाटन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बालगंधर्व नाट्यमंदिर येथे झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे, आंतरराष्ट्रीय प्रयोगकला व संशोधन संस्थेचे संचालक प्रसाद वनारसे, विभाग नियंत्रक यामिनी जोशी, राजेंद्र पाटील, प्रताप सावंत, रघुनंदन कांबळे, प्रताप पवार आदी उपस्थित होते.

रावते म्हणाले, महामंडळाची माणसे ही मोठी व्हायला हवीत. मी स्वतः नाट्यवेडा माणूस आहे. नाटक हा महाराष्ट्राचा उपजत गुण असल्याने महाराष्ट्र हा नाट्यवेडा आहे. रात्रंदिवस काम करून मिळालेल्या वेळेत आपली कला सादर करणे ही सोपी गोष्ट नसून, सर्वगुणांनी संपन्न असे महामंडळातील कर्मचारी असून, याचा मला सार्थ अभिमान आहे. भविष्यात व्यावसायिक नाटकांमध्ये काम करून मोठे नाव झाल्यानंतर जेव्हा रसिक चर्चा करतील, त्यावेळी हा कलावंत यापूर्वी एसटीमध्ये काम करीत होता, असे रसिकांना समजल्यास महामंडळाचेच नाव आणखी मोठे होईल. तसेच या नाट्य स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना वेतनवाढ देण्यात येईल, असेही रावते यांनी यावेळी सांगितले.

वनारसे म्हणाले, गेल्या ४६ वर्षांपासून एसटी महामंडळ अशा नाट्य स्पर्धा घेत असून, ही अभिमानाची गोष्ट आहे. माधव काळे म्हणाले, मोबाइलमुळे कुटुंबातील संवाद संपला आहे. काम सांभाळून नाटक करणे सोपी गोष्ट नसून, कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. सूत्रसंचालन वामन जोग यांनी केले. यामिनी जोशी यांनी आभार मानले.