
हिंदुस्थानी लोक दररोजचे सरासरी सहा तास मोबाईल स्क्रिनसमोर घालवतात. हा देशासाठी चिंतेचा विषय आहे, असे सांगून आठवडय़ातून एक दिवस डिजिटल फास्टिंग म्हणजेच मोबाईलपासून दूर राहण्याचा उपवास करा, अशी सूचना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना केली. दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजित ‘परीक्षा पे चर्चा 2023’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांनी कॉपी करून पास होणाऱया विद्यार्थ्यांचेदेखील कान टोचले. कॉपी आणि शॉर्टकटचा आधार घेऊन तुम्ही आयुष्यभर सफल होऊ शकत नाही, असेही मोदी म्हणाले.
एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देत असताना मोदी म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना सर्वात आधी निर्णय घ्यावा की, तुम्ही स्मार्ट आहात की गॅझेट स्मार्ट आहे. कधी कधी असे वाटते विद्यार्थी स्वतःपेक्षा गॅझेटला स्मार्ट समजतात आणि तिथूनच पुढे चूक होते. तुम्ही जेवढे स्मार्ट असाल तेवढे अधिक गॅझेटला तुम्ही स्मार्टली वापरू शकाल,’’ असेही मोदी यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी मोबाईलवर रील्स बघणाऱयांनाही मोलाचा सल्ला दिला आहे.
शॉर्टकट, कॉपीचा आधार कधीपर्यंत…
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, परीक्षेत शॉर्टकट, कॉपीचा आधार तुम्ही कधीपर्यंत घेणार आहात? एक किंवा दोन परीक्षेत तुम्हाला कॉपीमुळे थोडीफार मदत होईल, मात्र त्यापुढे आयुष्यात त्याचा काय उपयोग होणार आहे. विद्यार्थ्यांना अपार कष्टच आयुष्यात पुढे चालण्यासाठी मदत करेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मुलांकडे पैसे द्या, त्यांना फिरायला पाठवा
यावेळी पंतप्रधानांनी मुलांच्या पालकांनाही सल्ला दिला. आपल्या मुलांच्या कक्षांचा तुम्हीच विस्तार करा. मुलांना घरात बसवून ठेवण्याऐवजी दहावी, बारावी परीक्षा झाल्यावर मुलांना किमान पाच दिवसांसाठी फिरायला पाठवा. घरी परत येताना तुमची मुले खूप काही शिकून येतील याचा अनुभव तुम्हाला घेता येईल, असेही मोदी यांनी सांगितले.



























































