अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर, दिलीप प्रभावळकर, स्वाती चिटणीस यांना ‘जीवनगौरव’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या वतीने आज पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. रंगभूमीवरील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना यंदाचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘कुटुंब किर्रर्रतन’ या नाटकासाठी संकर्षण कऱहाडे याला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर ‘करुणाष्टके’ नाटकासाठी पर्ण पेठे हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून गौरविण्यात येणार आहे. 14 जून रोजी सायंकाळी 4 वाजता माटुंगा येथील यशवंत नाटय़ मंदिर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मध्यवर्ती, मुंबईच्या वतीने दरवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ 14 जून रोजी रंगकर्मींना गौरविण्यात येते. यंदाच्या पुरस्कार सोहळय़ात व्यावसायिक नाटय़ पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट लेखक प्राजक्त देशमुख (करुणाष्टके), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अमेय दक्षिणदास (कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट नेपथ्यकार ऋतुजा बोठे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकार किशोर इंगळे (कुटुंब किर्रर्रतन), सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीतकार अजित परब (बोलविता धनी), सर्वोत्कृष्ट रंगभूषाकार उल्लेश खंदारे (भूमिका), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक कुटुंब किर्रर्रतन’ला पुरस्कार मिळाला आहे.

‘कर्ण’ सर्वोत्कृष्ट

सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक-संगीत पद्माराणी, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक-कर्ण, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक दिग्दर्शक-आशुतोष वाघमारे (दगडी भिंत), सर्वोत्कृष्ट पुरुष कलाकार इरफान मुजावर (युटोपिया), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आश्विनी आंचवले (अय), प्रायोगिक संगीत नाटक सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता अभिषेक काळे (संगीत कटय़ार काळजात घुसली), प्रायोगिक संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री अनुष्का आपटे यांची निवड करण्यात आली.