साहित्य दुर्गा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

फुलांचा सुगंध सुखदुखाःच्या पल्याड असतो असं म्हणत स्वागत करणाऱ्या दुर्गाबाईंसारख्या विदुषीला पाहायला आणि किंचित बोलायला मिळालं याचंच मला अप्रूप वाटलं. आज दुर्गाबाईंचा स्मृतीदिन त्यानिमित्त या आठवणी.

आमचं ‘श्री’ साप्ताहिकाच्या दिवाळी अंकाचं काम सुरू होतं. अनेक मान्य्य्यवरांचे लेख येत होते. एके दिवशी घाईघाईने दुर्गा भागवत सकाळी अकराच्या सुमारास आाफिसात आल्या. ’‘हा माझा लेख. नंतर फोन करा.” एवढं बोलल्या आणि तशाच तडक निघून गेल्या. मी त्या वेळी अगदी नवखा पत्रकार होतो. दुर्गाबाईंसारख्या विदुषीला पाहायला आणि किंचित बोलायला मिळालं याचंच मला अप्रूप वाटलं. तसं मी त्यांना एशियाटिक लायब्ररीत दुरून ओझरतं पाहिलं होतं इतकंच. आमच्या आाफिसात आल्या तेव्हाही त्या तिथेच जाण्याच्या गडबडीत होत्या. ते ज्ञानमंदिर हे त्यांचं दुसरं घरच होतं. पुढे 1975मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केली त्याच वेळी कराडला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून दुर्गाबाईंची निवड झाली. ते संमेलन होईपर्यंतच्या काळात त्या आणीबाणीविरोधात परखडपणे बोलत होत्या. त्यांना एशियाटिक लायब्ररीतच भेटलो तेव्हाही त्यांचा मूड आक्रमक होता. साहित्य संमेलनानंतर दुर्गाबाईंना अटक झाली. आपल्या विचारांशी एकनिष्ठ असलेल्या दुर्गाबाईंना त्यातही विशेष वाटलं नाही. कराड येथे झालेल्या संमेलनात तर कारावासातील जयप्रकाश नारायण यांच्या प्रकृतीला आराम पडावा अशी प्रार्थना सर्वांनी उभं राहून करावी, असं त्यांनी सुचवलं. त्या वेळी संमेलन मंडपात देशाचे केंद्रीयमंत्री यशवंतराव चव्हाणसुद्धा होते.

आणीबाणीनंतर दूरदर्शनवरच्या एका कार्यक्रमात दुर्गाबाईंचं वर्णन एक सप्तरंगी ज्वाला असं करण्यात आल्याचं आठवतंय. नंतरच्या काळात त्यांच्याशी बोलणं झालं ते पत्रकारितेच्या माध्यमातूनच. ‘श्री’ साप्ताहिक ‘लोकसत्ता’च्या प्रेसमध्ये तेव्हा छापलं जायचं. तिथे दुर्गाबाई अधूनमधून, बहुदा एखादा लेख किंवा एखादी सामाजिक समस्या घेऊन येत असत. आपलं म्हणणं तावातावाने मांडत.

प्रदीर्घ जीवनात त्यांनी आणि त्यांच्या शास्त्रज्ञ भगिनी कमलाताई सोहोनी यांनी कसलीही तडजोड केली नाही. एकदा ‘ग्रंथाली’मधल्या कार्यक्रमात या आपापल्या क्षेत्रातल्या दिग्गज बहिणींची एकत्र मुलाखत रंगली होती. अगदी बालपणापासूनच्या आठवणींत त्या वेळी त्या रमल्या. कमल सोहोनींच्या कार्याविषयी वसुमती धुरु यांनी लिहिलेल्या ‘विज्ञान विशारदा’ या पुस्तकातलं ‘विशारद’ हे दुर्गाबाईंनीच सुचवलं होतं.

मराठी भाषेवर, शब्दांवर त्यांचं नुसतं प्रभुत्व नव्हे तर प्रेम होतं. राजाराम शास्त्राr भागवत यांच्यासारख्या विद्वान अभ्यासकाशी असलेलं त्यांचं नातं ही परंपरा आणि साहित्याची अभ्यासपूर्ण लेखनातून परखडपणाने व्यक्त होण्याची शैली यातून दुर्गाबाईंचं व्यक्तिमत्त्व घडलं. त्यांनी विविध भाषांचा साकल्याने अभ्यास केला. मराठी, इंग्लिश तर त्यांना येत होतं, पण संस्कृत, पाली आणि मध्य प्रदेशातील आदिवासी जीवनाचा अभ्यास करताना तिथल्या बोलीभाषेशी त्यांचा परिचय झाला. त्या बंगालीसुद्धा शिकल्या. आदिवासी संस्कृती आणि नंतर आलेली आताची शहरी संस्कृती याचा तुलनात्मक लेखाजोखा त्यांनी मांडला. या मोहिमेवर त्या आदिवासी पाडय़ांवर एकटय़ा फिरत असत. त्यांना त्या सर्व जमातींचं प्रेम आणि सौहार्द लाभलं. कधीही भीती वाढली नाही. मात्र याच प्रकल्पाचं काम करताना एका कंदमुळाची आलर्जी येऊन त्या अचानक आजारी पडल्या. ते खाण्यात आलं असतं तर कदाचित विपरित अवस्था ओढवली असती. बाईंना मुंबईतल्या गिल्डर लेनमधल्या त्यांच्या घरी परत यावं लागलं. तिथे एका खिडकीजवळ, अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांच्या संवेदनशील, साहित्यिक मनाने निसर्गाचं वर्षभरातलं बदलतं रूप मनात साठवलं आणि त्यातून ‘ऋतुचक्र’ हे त्यांचं गद्यकाव्यासारखं अमर पुस्तक जन्माला आलं. त्याचं अभिवाचन नीलम प्रभू (करुणा देव) यांच्या स्वरात व्हावं असं मला वाटत होतं. तशी जुळवाजुळव करीत असतानाच दुर्गाबाई आजारी झाल्या.

मी आणि पत्रकार मुकुंद कुळे त्यांना भेटायला गेलो होतो. नव्वदी उलटलेल्या दुर्गाबाई पूर्वीच्या वाटत नव्हत्या. त्यातच कमलाताईंच्या निधनाचा घाव त्यांना विव्हळ करणारा होता. त्यानंतर ‘देहोपनिषद’ लिहिणाऱया दुर्गाबाईंनी भेटीतलं पहिलं वाक्य उच्चारलं – ‘फार जगले!’ काय बोलावं तेच आम्हाला सुचेना. मुकुंदने बाईंची आवडती चाफ्याची फुलं घेतली होती. ती ओंजळीत घेतल्यावर मात्र त्यांच्या डोळय़ांत निरागस बालिकेची चमक आली. त्या मंद स्मित करीत म्हणाल्या, ’‘फुलांचा असा सुगंध सुख-दु:खांच्या पलीकडे नेतो.” मग बऱयाच गप्पा झाल्या. त्या मी ‘मायक्रोकॅसेटवर रेकॉर्ड केल्या. फोटोही काढले. त्यांच्या घरच्या मंडळींनी (चारूताई आणि मोहनराव) आमचं आपुलकीने आगतस्वागत केलं. त्या आठवणी घेऊन परतो. त्यानंतर मात्र दुर्गाबाई फार काळ राहिल्या नाहीत. त्यांच्या परवानगीने ‘ऋतुचक्र’च्या ध्वनिमुद्रणाची कल्पना विरून गेली. कालांतराने नीलमताईसुद्धा गेल्या. मनाला कायमची रुखरूख लावणाऱया अशा गोष्टी विसरता येत नाहीत. मायक्रो कॅसेटचाही जमाना गेला. दुर्गाबाईंशी झालेला तो संवाद अजूनही डिजिटल होण्याच्या प्रयत्नात मी आहे. त्यांच्याशी झालेल्या गप्पा मात्र कायमच्या स्मरणात राहतील. आजच दुर्गाबाईंचा स्मृतीदिन त्यानिमित्त या आठवणी.

[email protected]