स्मृतिगंध- सीमा देव… सात्त्विक, सोज्वळ 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप ठाकूर

 

 

 24 ऑगस्ट रोजी ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. सीमा देव यांचे निधन म्हणजे मराठी सिने–नाटय़सृष्टीच्या दीर्घ वाटचालीतील एका पर्वाचा अस्त होण्यासारखे आहे. मराठी चित्रसृष्टीतील सोज्वळ चेहरा अशी ओळख असणाऱया सीमा देव यांचे जाणे म्हणजे सिनेरसिकांसाठी आपल्यातलेच कुणीतरी गमावल्यासारखे आहे. आपलेच कोणीतरी गेले.

 

सीमाताई देव यांच्या दीर्घकालीन वाटचालीबाबत सांगावे तेवढे थोडेच. खूप जुन्या आठवणीत जाऊन सांगायचे तर, साठच्या दशकात लहानपणी गिरगावातील खोताची वाडीत लहानपणी आई आणि आजीसोबत मॅजेस्टिक थिएटरमध्ये मराठी चित्रपट पाहू लागलो तेव्हा ‘सीमा देव’ हे नाव पहिल्यांदा माहीत झाले, पण तेव्हा अजिबात कधी वाटले नव्हते की, आपण कधी सिनेपत्रकार होऊ व त्यात या देव कुटुंबीयांशी अतिशय जवळचे आणि विश्वासाचे नाते गुंफले जाईल.

सीमा देव यांची मुलाखत घेण्यासाठी 1983 साली मी तेव्हा देव कुटुंबीयांच्या जुहू कोळीवाडा कॉर्नरवरच्या मेघदूतमध्ये भेटलो. त्यांच्या अनेक भूमिका पाहून माझ्या मनात मराठीतील परंपरा, मूल्ये, संस्कृती, सभ्यता जपणारी अभिनेत्री अशी माझ्या मनावर प्रतिमा ठसली होती आणि त्या प्रतिमेला अनुसरूनच मी त्यांची पहिली मुलाखत घेतली. मुलाखत संपल्यावर त्यांनी माझी अगदी अगत्याने चौकशी केली. मी मुंबईत कुठे राहतो (योगायोग असा की, त्यांचे लहानपणही गिरगावातील बनाम लेन येथील होते), याच क्षेत्रात का आला, घरी कोण असते वगैरे वगैरे. अशी आपुलकी हे त्या काळाचे सर्वात मोठे वैशिष्टय़. जणू त्यांनी माझीच एक प्रकारची मुलाखत घेतली. त्यानंतर रमेश देव, सीमा देव, अजिंक्य आणि अभिनय यांची अनेकदा प्रत्यक्ष वा फोनवर भेट झाली.

त्या काळात हिंदी चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोटिंगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना कधी आमंत्रण असे अथवा कधी बोलावले जाई. असेच एकदा टी. रामाराव दिग्दर्शित ‘मजबूर’च्या मेहबूब स्टुडिओतील सेटवर गेलो असता सनी देओल आणि सीमाताई यांच्यावर काही दृश्ये चित्रित होत होती. सीमाताईंशी संवाद साधताच त्या म्हणाल्या, “सनीच्या आईची भूमिका साकारतेय…” तेवढय़ात मी त्यांना म्हणालो, “तुमचे एका वेगळय़ा गोष्टीसाठी कौतुक करायला हवे. तुम्ही ’गजब’मध्ये धर्मेंद्रच्या आईची भूमिका साकारल्यावर आता त्याच्या मुलाच्या आईची भूमिका साकारत आहात.” हे ऐकताच त्यांनी अचंबित होऊन छान हसून दाद दिली.

कधी देव कुटुंबीयांची निर्मिती असलेल्या ’सर्जा’, ’चोर चोर’, ’जिवा सखा’ या चित्रपटाच्या निमित्ताने झालेली भेट, कधी रमेश देव यांच्या वाढदिवसाचा सोहळा, सुलोचनादीदींना पद्मश्री पुरस्काराने गौरवले म्हणून देव कुटुंबीयांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा योग, त्यांनी लिहिलेल्या ’सुवासिनी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा, झी अथवा मटा सन्मानची पार्टी इतकेच नव्हे तर पूर्वीच्या त्यांच्या जुहूच्या कोळीवाडा कॉर्नरवरच्या मेघदूतमधील चौथ्या मजल्यावरील घरी जाणे असो अथवा कालांतराने देव कुटुंबीय जुहू-वर्सोवा लिंक रोडवर समुद्राच्या साक्षीने राहायला गेले तेव्हा असो, सीमाताईंना मी कायमच वाकून नमस्कार करून भेटलो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात असलेला आदरच त्यातून व्यक्त केला. सुलोचनादीदी आणि सीमाताई यांना मी कायमच वाकून नमस्कार करून भेटलो. रमेश देव आणि सीमाताई यांच्या पहिल्या भेटीचा किस्सा खूप रंजक आहे. गोरेगावच्या फिल्मीस्तान स्टुडिओत या दोघांचीही काही अंतराने पीन टेस्ट झाली आणि तेव्हा ’आलिया भोगासी’ या चित्रपटासाठी ते भाऊ-बहिणीच्या भूमिकेसाठी निवडले गेले. कालांतराने गोविंद सरय्या दिग्दर्शित ’सरस्वतीचंद्र’ या हिंदी चित्रपटातही भाऊ बहिणीची भूमिका साकारली.

सीमाताईंनी अनेक वर्षे हिंदी चित्रपटात लहान-मोठय़ा भूमिका साकारताना नूतन, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यापासून अनिल कपूर, गोविंदा, श्रीदेवीपर्यंत किमान दोन पिढय़ांतील स्टारसोबत भूमिका साकारली आणि त्यासह त्यांच्याकडे तेवढे अनुभवही बरेच. हृषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ’आनंद’ (1971) मध्ये रमेश देव आणि सीमाताई पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. तेव्हा राजेश खन्ना कमालीचा बिझी असल्याने त्याच्या वेळेनुसार सगळे शूटिंग होई, पण तेवढेच तो सहकार्य देत रस घेई अशी आठवण त्या सांगत.

रमेश देव आणि सीमा यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने (1 जुलै 2015) या दांपत्याच्या खास मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. दिवसाला एक याप्रमाणे या मुलाखती होत्या. या निमित्ताने माझी भेट अगदी विशेष ठरली. खूप गप्पा रंगल्या. लग्नाचा पन्नासावा वाढदिवस अतिशय छान साजरा झाला. जुहूच्या इस्कॉनच्या प्रशस्त हॉलमध्ये मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अगणित मान्यवरांनी येऊन देव दांपत्याला मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या तेव्हा सीमा देव यांना झालेला आनंद अवर्णनीय होता.

अधूनमधून एखाद्या विषयानिमित्ताने सीमाताईंशी फोनवरही बोलणे होत असताना स्वाभाविकपणे ’आजच्या आणि कालच्या चित्रपटसृष्टीचे विषय निघत’. संपूर्ण करीअरमध्ये त्यांना मुस्लिम स्त्राrची भूमिका साकारायला मिळाली नव्हती. तो योग महेश कोठारे दिग्दर्शित ’दुभंग’ या चित्रपटात आला, तर एकदा मी त्यांची लता मंगेशकर यांचा त्यांना लाभलेला प्लेबॅक या विषयावर मुलाखत घेतली. तेव्हा त्या खूपच भारावून गेल्या. या विषयावर त्या पहिल्यांदाच बोलत होत्या. ’आम्ही गिरगावकर’ या कॅलेंडरसाठी रमेश देव आणि सीमा यांच्या मुलाखती अर्थात आवश्यक होत्याच. एकेकाळचे दोघेही गिरगावकरच. त्या बनाम लेनमध्ये राहायच्या. जुने गिरगाव आठवून त्या भारावून गेल्या. 1998 च्या  जानेवारीत श्रीगणेश जयंतीनिमित्त देव दांपत्य गिरगावातील आमच्या खोताची वाडीत मुलाखतीसाठी आले असता त्यांना मी गिरगावातील जुन्या आठवणींबाबत बोलते केले.

अशा अगणित छोटय़ा-मोठय़ा भेटीतून एकूणच देव कुटुंबाशी मी जोडलेला राहिलो. अजिंक्य देव अभिनयाच्या क्षेत्रात नवीन असताना त्यांच्या मुलाखतीसाठी मेघदूतमध्ये मुख्य खोलीत आम्ही दोघे बसलो असताना आमची प्रश्नोत्तरे रंगली असतानाच माझ्या लक्षात आले की, सीमाताईं थोडय़ा आडोशाला बसून आपला मुलगा कशी मुलाखत देत आहे हे जाणून घेत आहेत. यात त्यांचे मुलावरचे प्रेमच दिसत होते. अभिनय देव दिग्दर्शित ’दिल्ली बेल्ली’ या चित्रपटावरची त्यांची प्रतिािढया आजही आठवतेय. काळ बदललाय, सिनेमा बदललाय, प्रेक्षक बदललाय हे सीमाताईंनी कळत-नकळतपणे चांगल्या प्रकारे स्वीकारले होते हे जाणवले. आता या सर्व आता आठवणी राहिल्यात. एक खूपच जवळची व्यक्ती ’जगाच्या पाठीवर’वरून कायमची निघून गेली आहे.

एक खूपच मोठा अभिनय प्रवास आणि ठसा. सात्त्विक, सोज्वळ भूमिका साकारत आपली एक विशेष ओळख निर्माण करणाऱया सीमा देव यांनी राजदत्त दिग्दर्शित ’अपराध’ ( 1969) या चित्रपटात चक्क रमेश देव यांच्यासोबत खलप्रवृत्तीची भूमिका साकारत आश्चर्याचा धक्काच दिला, तर सतीश कौशिक दिग्दर्शित ’रूप की रानी चोरों का राजा’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विचित्ररीत्या कापल्याने त्यांनी बराच काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहणे पसंत केले आणि अमोल शेटगे दिग्दर्शित ’जेता’मधून त्यांनी रमेश देव व अजिंक्यसोबत पुनरागमन केले.  कायमच कुटुंबात रमणे, मुले आणि नातवंडांवर प्रेम करणे, मनमुराद वाचन करणे, स्वयंपाकाची मनसोक्त आवड आणि पाहुण्यांचे स्वागत करणे अशा अनेक वैशिष्टय़ांमधून त्यांनी आयुष्याचा आनंद घेतला आणि इतरांनाही दिला.

[email protected]