अमिताभ यांना केला वाकून नमस्कार, खलिस्तान्यांची पंजाबी गायक दिलजीत दोसांझला दिली धमकी

खालिस्तानी दहशतवादी संघटना सिख ऑर जस्टीसने पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याचा 1 नोव्हेंबरला होणारा कॉन्सर्ट बंद पाडण्याची धमकी दिली आहे. दिलजीत याने ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केल्याने ही धमकी आली आहे. त्याने असे करून 1984 मध्ये झालेल्या शीख हत्यांकाडांचा अपमान केल्याचे खलिस्तान्यांचे म्हणणे आहे.

बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोच्या 17 व्या सिझनमध्ये दिलजीत दोसांझने सहभाग घेतला होता. शो च्या प्रोमोमध्ये त्याने अमिताभ यांना वाकून नमस्कार केला आणि त्यांची गळाभेट घेतली. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती.

दहशतवादी संघटनेच्या मते, अमिताभ बच्चन हे बॉलीवूड अभिनेते आहेत ज्यांनी 31 ऑक्टोबर 1984 रोजी “खून का बदला खून” (रक्ताच्या बदल्यात रक्त)” या घोषणेसह हिंदुस्थानी जमावाला भडकावले होते. ज्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात 30 हजारहून अधिक शीख पुरुष, महिला आणि मुले मारली गेली. ज्यांच्या शब्दांनी हत्याकांडाला उत्तेजन दिले, त्या अमिताभ बच्चन यांच्या पायांना स्पर्श करून दिलजीत दोसांझने 1984 च्या शीख नरसंहारातील प्रत्येक पीडित, प्रत्येक विधवा आणि प्रत्येक अनाथाचा अपमान केला आहे, असे एसएफजेचे जनरल कौन्सिल गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी देत म्हटले आहे.