
> संजय कुळकर्णी
व्यावसायिक रंगभूमीवर अनेक गमतीदार किस्से नेहमीच घडत असतात. असाच एक किस्सा शुक्रवार 28 एप्रिलला विलेपार्लेच्या दीनानाथ नाटय़गृहात दुपारी सादर झालेल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’च्या प्रयोगात घडला. अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचा प्रवेश सुरू होता. प्रवेश रंगात आलेला आणि प्रेक्षकांच्या हास्याची लकेर नाटय़गृहात घुमत होती. इतक्यात रंगमंचावर काही सेकंदात शांतता पसरली. कारण एक उंदीर स्टेजवर धुमाकूळ घालत होता. निर्मितीने अशोक सराफ यांना ते निदर्शनास आणून दिले. ते ही त्याच्याकडे एकटक पाहू लागले. प्रेक्षकांनासुद्धा काय झालंय ते समजलं. एका उंदराने नाटकाच्या रंगतीस खीळ घातली. दीनानाथ नाटय़गृहात उंदीर प्रयोग सुरू झाल्यावर प्रेक्षकागृहात सर्रासपणे फिरत असतात. एक बरं की, ते कुणाला चावत नाहीत. बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहातसुद्धा उंदरांचा सुळसुळाट नेहमीच पाहायला मिळतो. एकूण काय ती दोन्ही नाटय़गृहे महानगरपालिकेची आहेत. त्याची स्वच्छता आणि निगा यांच्याकडे ते लक्षपूर्वक पाहत नाहीत. त्याच्यावर कुणाचाही वचक नाही. हे सर्व पाहता म्हणावंस वाटतं की, ‘मामांच्या प्रयोगाला मामा’. आता ही चर्चा व्यावसायिक नाटय़सृष्टीत रंगणार.
























































