
अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपाच्या जेवणावळीत आजही शाही सरंजाम होता. चिकन खिमा पॅटीस, सुरमई फ्राय, मालवणी चिकन, घावणे, मटण बिर्याणी आणि स्वीट डिश म्हणून बादशाही फालुदा असा जेवणाचा सुग्रास बेत होता.
विधान भवनात आयोजित केलेल्या अंदाज समित्यांच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपानिमित्त सलग दुसऱ्या दिवशी व्हीव्हीआयपी निमंत्रितांसाठी शाही खाना होता. दादरच्या निखिल कॅटरर्सला जेवणाचे कंत्राट देण्यात आले होते. आज व्हीव्हीआयपींसाठी अडीचशे ताटांची ऑर्डर होती. चांदीच्या थाळीत जेवण होते. एका डिशची किंमत सरासरी चार ते सहा हजार रुपये होती अशी चर्चा आहे. चांदीच्या थाळ्या भाडय़ाने आणल्या होत्या. चांदीच्या एका थाळीचे भाडे पाचशे रुपये होते. दोन दिवसांच्या दोन शाही जेवणावर सुमारे 36 लाख रुपयांहून अधिक खर्च झाल्याची चर्चा आहे.
असा होता मेन्यू
चिकन खिमा, पॅटीस, सुरमई फ्राय, कोथिंबिर वडी, दही वडा, काळा वटाणा उसळ, मालवणी चिकन, घावणे, पुरी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी, पुरणपोळी आणि त्यावर साजुक तुपाची धार, बादशहा फालुदा (त्यावर गुलाबाचे डेझर्ट. सोबत कुल्फी.)
आलिशान शामियाना आणि झुंबर
शाही भोजनासाठी आलिशान वॉटरप्रूफ शामियाना बांधण्यात आला होता. रेड कार्पेट, दिव्यांची देखणी झुंबरे, मऊशार खुर्च्या आणि आरसा असलेले पंचतारांकित वॉश बेसिन होते.
z या परिषदेच्या समारोपात भाषण करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी रोखण्याचे आणि सरकारचा प्रत्येक रुपया जपून वापरण्याचे आवाहन केले होते. मात्र दुसरीकडे शाही जेवण आणि मंडपावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी असे परस्पर विरोधी चित्र या परिषदेच्या निमित्ताने पाहायला मिळाले, असे सरकारी अधिकारीच सांगतात.