#MeToo प्रकरणी दिग्दर्शक विकास बहलला क्लीन चीट

53

सामना ऑनलाईन । मुंबई

क्वीन चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहल यांच्यावर त्यांच्याच एका महिला सहकर्मचार्‍याने लैंगिक छळाची तक्रार केली होती. याप्रकरणी बहल यांना क्लीन चीट मिळाली आहे. विकास बहल हा फँटम या कंपनीचा सहसंस्थापक आहे. बहल याच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर ही बहलची कंपनीतून हकालपट्टी करण्यात आली होती.  फँटम कंपनीची अर्धी मालकी रिलायन्सकडे असल्याने रिलायन्सने या आरोपांसंदर्भात चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने बहल यांना क्लीन चीट दिली आहे.

मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. विकास बहल, अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाणे यांनी फँटम या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. विकास बहल यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप झाल्यानंतर त्यांचे नाव सुपर 30 या चित्रपटातून हटवण्यात आले होते. चित्रपटात हृतिकची प्रमुख भुमिका आहे. हृतिकने ट्विट करून याबाबत योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी केली होती. त्यानुसार विकास बहल यांना या चित्रपटातून हटवण्यात आले होते. बहल यांच्यावर आरोप झाल्यानंतर अनुराग कश्यप आणि मोटवाणे यांनी मिळून विकास बहल यांना संस्थेमधून काढून टाकले आणि फँटमची अर्धी मालकी रिलायन्सला विकली.

सदर प्रकरण हे 2017 सालचे आहे. विकास बहल यांच्यावर ज्या महिलेने आरोप केला आहे ती फँटमची कर्मचारी नव्हती. या महिलेसोबत आपण काही प्रकल्पांसाठी आपण एकत्र काम केल्याचे बहल यांनी चौकशी समितीला सांगितले होते. “मला तिच्याशी चर्चा करायची आहे. माझ्या वागण्याने तिला खरंच त्रास झाला असेल तर मला माफी मागायाची आहे” असेही बहल यांनी चौकशी समितीसमोर सांगितले होते.

बहल यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने  त्यांच्याविरोधात कुठेही रितसर तक्रार दाखल केली नव्हती. जेव्हा रिलायन्सच्या चौकशी समितीने या महिलेला चौकशीसाठी जेव्हा तिला बोलावले तेव्हा तिने काहीही प्रतिसाद नव्हता. आरोप करणार्‍या महिलेची बाजू उचलून धरणाऱ्यांशी समितीने चर्चा केली आणि या चर्चेनंतर बहल यांना क्लीन चीट देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या