स्टार सिंधूचा बॅड खेळ कायम, जपान ओपन सुपर स्पर्धेत सलामीलाच गारद

हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपल्या ‘बॅड’ खेळात सातत्य दाखवले आहे. निराशाजनक कामगिरीमुळे ती जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत सलामीलाच गारद झाली. तिला कोरियाच्या सिम यू-जिन हिने सरळ सेटमध्ये पराभूत करीत बाहेरचा रस्ता दाखविला. मात्र, पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने, तर पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी अंतिम 16 मध्ये प्रवेश केला.

सिंधूला सिम यू-जिनने 21-15, 21-14 असे अवघ्या 37 मिनिटांत पराभूत केले. या दोन्ही गेममध्ये कोरियन खेळाडूंनीच वर्चस्व गाजविले, मात्र दुसरीकडे पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनने पहिल्या फेरीत चीनच्या वांग जिनसेंगचा 21-11, 21-18 असा पराभव केला. आता दुसऱया फेरीत त्याच्यापुढे जपानच्या कोडई नराओकाचा सामना करावा लागणार आहे.

पुरुष दुहेरीत सात्त्विक-चिराग जोडीने डोंग जू व कांग मिन ह्युक या चिनी जोडीचा 21-18, 21-10 असा पराभव करीत आगेकूच केली. हिंदुस्थानी जोडीने 40 मिनिटांतच ही लढत जिंकली. आता उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांची लढत चीनच्याच सी. वांग आणि डब्ल्यू. के. लियांग जोडीशी पडेल. अमसाकरुणन आणि रथिनासबापती या हिंदुस्थानी जोडीला प्रारंभीच पराभवाचा धक्का बसला. त्यांना कोरियन किम आणि सिओ जोडीने 21-15, 21-9 असे नमवले.