लोअरपरळ वर्कशॉपच्या परीसरातच डिस्पेन्सरी राहणार; कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाला ‘परे’च्या डीआरएम यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या लोअरपरळ येथील कारखान्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मोडकळीस आल्याचे वृत्त दैनिक सामनाने दिले होते. त्याची दखल घेण्यात येऊनही डिस्पेन्सरी येथून अन्यत्र हलविण्यात येणार नसल्याचे आश्वासन डीआरएम जीव्हीएल सत्यकुमार यांनी भारतीय कामगार सेनेच्या शिष्ठमंडळाला सोमवारी दिले.

पश्चिम रेल्वे भारतीय कामगार सेनेच्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक जी.व्ही.एल सत्यकुमार यांना मुंबई सेंट्रल यांनी लोअर परळ वर्कशॉप येथील दवाखान्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी वर्कशॉप मधील अडीच ते तीन हजार कामगारांसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र गरजेचे असल्याचे त्यांना कामगारांच्या शिष्ठमंडळाने समजावून सांगितले. आपत्कालीन स्थितीत कामगाराला ताबडतोब औषधोपचार मिळायला हवे अशी फॅक्टरी अ‍ॅक्ट 1948 मध्ये तरतूद आहे.

2021 साली झालेल्या सर्वेक्षणात दवाखान्याच्यावरील स्लॅब कोसळला होता, प्रशासनाने त्याची वेळीच दुरूस्ती न करता दुर्लक्ष केल्याने तसेच काही डॉक्टरांनीही दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती ओढावली असल्याचे शिष्ठमंडळाने सत्यकुमार यांना सांगितले. यावेळी वर्कशॉपजवळ दवाखाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सत्यकुमार यांनी कामगारांना दिले. कामगारांवर जर असाच अन्याय होत असेल तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचा इशारा यावेळी शिष्ठमंडळाने दिला. भारतीय कामगार सेनेच्या शिष्टमंडळात अध्यक्ष रवींद्र जाधव, सचिव गणेश मुरुडकर व इतर सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.