
जत तालुक्यातील कुंभारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेच्या कॅशिअरने महिलेची छेड काढल्याच्या प्रकाराची संचालक मंडळाच्या बैठकीत गंभीर दखल घेण्यात आली. त्या कॅशिअरची तत्काळ सांगली मुख्यालयात बदली करण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी सांगितले.
कुंभारीतील जिल्हा बँक शाखेतील कॅशिअरने गावातीलच एका महिलेची छेड काढली हाती. हा प्रकार शाखेत घडल्यानंतर सांगूनही त्याने महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न सुरून ठेवला. त्यामुळे संबंधित महिलेने ही बाब ग्रामस्थांच्या कानावर घातली. त्यानंतर संबंधित महिला आणि काही ग्रामस्थांनी शाखेत जाऊन त्या कॅशिअरची कानउघाडणी करीत चोप दिला होता. या कॅशिअरने यापूर्वी दोन ठिकाणी अशाप्रकारे महिलेची छेड काढल्याची चर्चा आहे. सनमडी शाखेत असताना त्याने छेड काढली होती. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर त्याची बेवनूरला बदली केली. तेथेही त्याने भानगड केली. त्यानंतर त्याची शेगाव आणि नंतर कुंभारीला बदली करण्यात आली.
कॅशिअरकडून काहीतरी कारणे सांगून वेळेवर ने येणे, दुपारनंतरच बँकेतून गायब होणे अशा तक्रारी प्रत्येक शाखेत त्या कॅशिअरबाबत होत्या. वादग्रस्त आणि बँकेची बदनामी करणारा कारभार असतानाही त्याची स्वतःच्या गावात बदली करण्यात आली होती. गावातीलच महिलेची छेड काढून त्याने गावची अब्रू त्याने वेशीवर टांगली. या प्रकाराची जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्या कॅशिअरची बदली करण्यात आली असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघ यांनी सांगितले.






























































