
सामना प्रतिनिधी, वसई
वसई तहसीलदार कार्यालय येथील नवनिर्वाचीत नायब तहसीलदार प्रदीप मुकणे हे चक्क दहावी नापास असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या दाखल्यावरील क्रमांकाचा वापर करून त्यांनी सेवापुस्तिकेत उत्तीर्ण असल्याचे दाखवून नोकरी मिळवली आहे, असा आरोप करणारी पोस्ट दाखल्याच्या फोटोसह सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रेशनकार्डावरील बोगस लाभधारकांना हुडकून काढल्याचा दावा करून स्वतःची पाठ थोपटून घेणारे वसईचे नायब तहसीलदार तथा पुरवठा निरीक्षक प्रदीप मुकणे यांनी नोकरी मिळवण्यासाठी बोगस दस्तऐवज सादर केल्याचे समोर आले आहे. जव्हार येथून के. व्ही. हायस्कूल येथून 1988 च्या मार्च शालांत परीक्षेत मुकणे नापास झाल्याचा शेरा शाळेने दिला होता. या शाळेने दिलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यात खाडाखोड करून त्यांनी पुढे स्वतःला पास दाखवून लिपिक पदासाठी अर्ज करत नोकरी मिळवली. 4638 या दाखला क्रमांकाच्या सहाय्याने मुकणे यांनी हा प्रताप केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रविण कांबळी यांनी केला आहे. दरम्यान मुकणे यांचा शाळा सोडल्याचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
बडतर्फीची कारवाई करा!
मुकणे यांनी प्रशासन तसेच नागरिकांचीही दिशाभूल केली असून त्यांना त्वरित सेवेतून बडतर्फ करण्यात याके, अशा मागणीचे पत्र पुराव्यासह प्रांताधिकारी दीपक क्षीरसागर यांना जागृत नागरिकांकडून सादर करण्यात आले आहे. याप्रकरणी तहसीलदार किरण सुरवसे यांनी आपल्याला काही माहिती नसल्याचे सांगून कार्यालयात मुकणे यांनी कोणती कागदपत्रे सादर केली आहेत, याची माहिती घ्या, असे सांगून अधिक माहिती देणे टाळले.
मुकणेंचे कारनामे
मागील 30 वर्षांपासून दहावी नापास अधिकारी नियमबाह्यरीत्या एकाच विभागात, एकाच कार्यालयात पदावर आहे. आधीच पुरकठा विभागातील गैरवन्यवहाराबद्दल मुकणे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र त्यांच्यावर आजपर्यंत कारवाई झालेली नाही. याबाबत कोकण आयुक्तांकडे चौकशी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी दीपक गुठे यांच्याकडे अहवालाची मागणी करण्यात आली असतानाच हे नवीन प्रकरण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.




























































