
हरयाणातील एक सुंदरी, गँगस्टरची गर्लफ्रेंड अशी ओळख मिरवणाऱ्या दिव्या पाहुजा हिची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. हरयाणातील एका हॉटेलमध्ये तिचा खून करण्यात आला. तिच्या हत्येप्रकरणी हॉटेल मालकासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दिव्या पाहुजा ही गँगस्टर संदीन गाडोली याची प्रेयसी होती. 7 फेब्रुवारी 2016 रोजी मुंबईतल्या अंधेरी भागातील एका हॉटेलमध्ये संदीप गाडोली याचा एन्काऊन्टर करण्यात आला होता. एन्काऊन्टर झाला तेव्हा दिव्या पाहुजा ही देखील संदीप गाडोलीच्या खोलीत होती. संदीपची टीप दिव्यानेच पोलिसांना दिली होती असा संशय व्यक्त करण्यात आला होता. दिव्याला या प्रकरणा मुंबई पोलिसांनी अटकही केली होती.
मंगळवारी रात्री दिव्या पाहुजा हिची हत्या करण्यात आली. तिच्या हत्येप्रकरणी हॉटेलमालत अभिजीत सिंह आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या ओम प्रकाश आणि हेमराज यांना अटक करण्यात आली आहे. अभिजीत सिंह याने दिव्याला गोळ्या घालून ठार मारले यानंतर ओम प्रकाश आणि हेमराज यांनी दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली असा आरोप आहे. यासाठी अभिजीत सिंह याने या दोघांना मिळून 10 लाख रुपये दिले होते. अभिजीतने साथीदारांसह मिळून दिव्याचा मृतदेह त्याच्या बीएमडब्ल्यूच्या डिक्कीत टाकताना आणि हॉटेलमधून पळून जातानाची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.

पोलीस चौकशीदरम्यान कळाले की अभिजीत सिंह हा ज्या हॉटेलमध्ये दिव्याची हत्या करण्यात आली, त्या सिटी पाँईटचा मालक आहे. त्याने हे हॉटेल भाड्याने दिलं होतं. अभिजीतने सांगितले की दिव्याकडे त्याचे अश्लील फोटो होते आणि ती या फोटोंचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करत होती. गेल्या काही दिवसांपासून तिची मागणी वाढायला लागली होती ज्यामुळे अभिजीत वैतागला होता. 2 जानेवारीला अभिजीतने दिव्याला हॉटेलवर बोलावलं होतं. यावेळी अभिजीतने सगळे फोटो मोबाईलमधून डिलीट कर असं म्हणत दिव्याला धमकावलं होतं. तिने नकार देताच अभिजीतने तिची हत्या केली.
कोण आहे ही दिव्या ?
दिव्या ही गुरुग्रामच्या बलदेव नगरची रहिवासी होती. ती एकेकाळी हरियाणाचा गँगस्टर संदीप गडोलीची प्रेयसी होती. हरियाणा पोलीस संदीपचा शोध घेत होते. 7 फेब्रुवारी 2016 रोजी हरियाणा पोलिसांना बातमी मिळाली की संदीप मुंबईतील अंधेरी येथील हॉटेलमध्ये आहे. यानंतर पोलिस तेथे पोहोचले आणि त्यांनी संदीपचे एन्काऊन्टर केले. गँगस्टर संदीप गडोलीच्या एन्काउंटरच्या वेळी दिव्याही मुंबईतील याच हॉटेलमध्ये होती. ती गुंड संदीप गडोली एन्काउंटर प्रकरणातील मुख्य साक्षीदार होती. या एन्काऊन्टर प्रकरणात मुंबई पोलिसांनी दिव्याला साक्षीदार बनवले होते.
संदीप गडोलीच्या कुटुंबीयांनी दिव्याचा काटा काढल्याचा आरोप
दिव्याच्या हत्येमागे संदीप गडोलीचे कुटुंबीय असल्याचा आरोप दिव्याच्या कुटुंबियांनी केला आहे. संदीप गडोलीची बहीण सुदेश कटारिया आणि भाऊ ब्रह्मप्रकाश यांनी दिव्याला ठार मारण्यासाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिव्याच्या कुटुंबीयांनी सुदेश आणि ब्रह्मप्रकाश यांच्या विरोधात हत्येचा कट रचल्याची तक्रार दाखल केली आहे.
























































