
साहित्य संस्कृती
महाराष्ट्रात अनेक प्रादेशिक स्तर असल्याने खाण्याच्या पदार्थातली विविधता सांगणारे, अनोखी मेजवानी देणारे लज्जतदार लेख या अंकात आहेत. कोकणातील खाद्यसंस्कृतीची ओळख करून देणारा विश्वास मुळीक यांचा लेख तसेच खान्देशी खास पारंपरिक चवदार खाद्यपदार्थांची माहिती देणारा पी. सदावर्ते यांचा लेख मस्तच! चारीठाव म्हणावी अशी मराठवाडय़ाची खाद्यसंस्कृती. चटण्या, कटाची आमटी हे इथले वैशिष्टय़. इथल्या चवदार व प्रसिद्ध खाद्यपदार्थांची ओळख पाककृतींसह या अंकात दिली आहे. विदर्भातील झणझणीत, चटपटीत व तैलदार खाद्यपदार्थांचा आस्वाद काकासाहेब वाळुंजकरांच्या लेखातून वाचकांना घेता येईल. उन्हाळय़ात केले जाणारे पापड, सांडगे, तांदळाच्या फेण्या, फणसाचे साठे, बाजरीच्या खारोडय़ा, पेंडवडय़ा, कुरडय़ा, चिकवडय़ा, मुसवडय़ा, मिरगुंडे, लोणचे आदी वाळवण संस्कृतीची पाककृतींसह माहिती देणारा शाल्मली सावंत यांचा लेख अप्रतिम.
संपादक : वंदना रमेश नाईक
मूल्य : 75 रु., पृष्ठ : 104
अर्थशक्ती दिवाळी अंक
‘अर्थशक्ती’ हे बँकिंग, विमा आणि गुंतवणूक या क्षेत्राना वाहिलेले मराठीतील वार्षिक आहे. या अंकात बँकिंग, विमा व गुंतवणूक या आर्थिक क्षेत्रातील वर्षभरातील घडामोडींचा आढावा घेण्यात आला आहे. या अंकात डॉ. अनंत लाभसेटवार, विनायक कुलकर्णी, वंदना धर्माधिकारी, रमेश नार्वेकर, उदय कुलकर्णी, राजीव जोशी, सुजाता टिकेकर, सुधाकर कुळकर्णी, गजानन म्हसकर आणि श्रीरंग हिर्लेकर यांचे माहितीपूर्ण लेख आहेत. वंदना धर्माधिकारी यांनी आरबीआयचे संचालक सतीश मराठे यांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत आहे. सहकारी बँकांचे व्यवस्थापन मंडळ, गांधी कमिटीच्या शिफारसी, सहकारी बँकांना मदत, सहकारी कायदे कानून आणि हिंदुस्थानची आर्थिक स्थिती या बाबींवर त्यांनी विस्तृतपणे मते मांडली आहेत. याखेरीज, बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची 50 वर्षे, शैक्षणिक कर्ज व समस्या, मोबाईल वॉलेट, बिटकॉइन, बिगर वित्तीय कंपन्या व रिझर्व्ह बँक हे बँकिंगविषयक महत्त्वपूर्ण लेख आहेत. ‘नो युवर बँक’मध्ये वसई कॅथॉलिक बँकेची ओळख करून देण्यात आली आहे. याखेरीज कॅशलेस बँकिंग, सरकारी बचत योजना, तीन बँकांचे विलीनीकरण आदी विषय या अंकात हाताळण्यात आले आहेत.
संपादक : रमेश नार्वेकर
मूल्य : 75 रु,. पृष्ठ : 132
सृजन
कला, लेख, व्यक्तिविशेष, मुलाखत, अनुवादित कथा, ललित, समीक्षा, चित्रपट, दीर्घ कविता, अनुवादित कविता असा दर्जेदार साहित्यिक फराळ घेऊन हा अंक प्रसिद्ध झाला आहे. सुधाकर गायकवाड यांच्या ‘माणूस, त्याचा समाज व बदल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सिद्धांतन’ या पुस्तकाची प्रभाकर गंभीर यांनी मांडलेली समीक्षा व शेतीविषयी समस्यांचा आढावा घेणारा सुभाष काकुस्ते यांचा लेख हे या अंकाचे खास वैशिष्टय़. वारली चित्रकार जिव्या सोमा मशे यांच्या कलेविषयीचा धांडोळा घेणारा भ. मा. परसावळे यांचा लेख अंकाला वेगळे परिमाण देणारा. ‘स्त्रियांच्या श्रमप्रतिष्ठsची तिसरी पायरी’ हा किरण मोघे यांचा लेख विचारप्रवृत्त करणारा आहे. मान्यवरांच्या अनुवादित कथा, कविता, अनुवादित कथाही वाचनीय. भ. मा. परसावळे यांच्या मुखपृष्ठाने अंकाला वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
संपादक : विजय ना. जाधव
मूल्य : 250 रु., पृष्ठ : 204
कृष्णाकाठ
या अंकातील ‘दख्खनी किल्ले : फ्रान्सिस जेल’ (अनुवाद सदानंद कदम), ऍबेकॅरेच्या नजरेतून 1672 ते 1673 (दीपा माने), सीतायन लेकपरंपरेतलं (डॉ. तारा भवाळकर),. भारतीय नद्यांचे अस्वस्थ वर्तमान (प्रभाकर ढगे), नदी आणि संस्कृती (संदीप नाझरे) हे लेख आवर्जून वाचावेत असे. देवभूमी (नंदू गुरव) हे प्रवासवर्णन मस्तच. भावे-सुखथनकर यांचा मन आणि भवताल (डॉ. निरंजन कुलकर्णी), थोर कलावंतांच्या रोमांचक, यशस्वी प्रेमकहाण्या (डॉ. श्रीकांत नरुले) हे लेख वाचकांना नक्कीच आवडतील. याशिवाय उज्ज्वला केळकर, अनुराधा फाटक, रंगराव पाटील यांच्या कथा व मुकेश माचकर यांची बोधकथा अंकात वाचायला मिळेल. मान्यवर कवींच्या कवितांनी हा विभाग समृद्ध झाला आहे. देखणे मुखपृष्ठ, सुबक मांडणी आणि दर्जेदार साहित्य असलेला अंक संग्राह्य आहे.
संपादक : शंभोराज काटकर
मूल्य : 125 रु., पृष्ठ : 140
मनशक्ती बालकुमार
भावी पिढी समृद्ध होण्यासाठी बालकुमारांना दर्जेदार साहित्य या अंकात वाचायला मिळते. पु. ल. देशपांडे यांचा ‘बालपणीचा काळ सुखाचा’ हा लेख पुलंच्या बालपणीची सफर घडवून आणणारा आणि अभ्यासाबरोबर इतर कलाही जोपासण्याचा संस्कार बालमनावर करणारा आहे. ‘वंदे मातरम्’ या चित्रपटातील देशभक्तिपर गीतांचा समावेश या अंकात केला आहे. सत्याची महती सांगणारा स्वामी विज्ञानानंदांचा लेख अंतर्मुख करणारा. समकाळाला समजून घेऊन लिहिलेल्या नामवंत साहित्यिकांच्या कथा व लेख आनंद देणारे आहेत. लेखांसोबतच सुसंगत चित्रे मन मोहवून टाकणारी. ज्ञानविज्ञान, मनोरंजनासोबतच अंकातील कृतिपर गोष्टी, विज्ञान प्रयोग व मान्यवरांच्या कविता मुलांना आवडतील अशाच. पुंडलिक वझे यांचे मुखपृष्ठ अंकाच्या देखणेपणात भर टाकणारे.
संपादक : श्रीहरी कानपिळे
मूल्य : 50 रु., पृष्ठ : 66
कमांडर
यंदाचा अंक हा राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट विशेषांक आहे. या अंकात राष्ट्रीय पारितोषिक मिळविणाऱ्या काही चित्रपटांची माहिती देण्यात आली असून यामध्ये अनेक महत्त्वाचे संदर्भ आहेत. तसेच राष्ट्रीय चित्रपटांचा 65 वर्षांचा इतिहासही या अंकातून उलगडला आहे. सोबत राष्ट्रीय पारिताषिकांची यादीही अंकात दिली आहे. दिलीप ठाकूर, मधू पोतदार, विजय पाडळकर, धनंजय कुलकर्णी, श्रीकांत देशपांडे, प्रशांत दैठणकर, डॉ. श्वेता बोरवणकर, प्रत्यंचा पाटोदकर आदी मान्यवरांनी यासाठी लिखाण केले आहे. याशिवाय सर्वाधिक चित्रपटांच्या बुकलेटस्चे संग्राहक म्हणून लिम्का बुकमध्ये नाव नोंदलेले नारायण फडके यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणारा धनंजय कुलकर्णी यांच्या विशेष लेखाचा समावेश या अंकात आहे.
संपादक : डॉ. संजय देवळाणकर
मूल्य : 100 रु., पृष्ठ : 108

























































