फेडरर-जोकोविच आमने सामने, राफेल नदाल उपांत्य सामन्यात पराभूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केदार लेले । लंडन

उपांत्य फेरीसाठी सेंटर कोर्टवर झालेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीत रॉडर फेडररने राफेल नदालचा 7-6, 1-6, 6-3, 6-4 असा पराभव केला. पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी परस्परांना कडवी लढत दिली, पण अनुभवी फेडररने हा सेट टायब्रेकमध्ये जिंकला, मात्र दुसर्‍या सेटमध्ये ‘फेड एक्सप्रेस’ घसरली. याचा फायदा नदालने उठविला. चिवट झुंज देत त्याने फेडररची सर्व्हिस दोन वेळा ब्रेक करत बाजी पलटवली. दुसरा सेट नदालने 6-1 अशा मोठय़ा फरकाने जिंकला. एक-एक सेट अशी बरोबरी झाल्यामुळे लढतीत पुन्हा रंगत निर्माण झाली. त्यानंतरच्या दोन्ही सेटमध्ये फेडररने वर्चस्व कायम राखत सामना खिशात घातला. अंतिम फेरीत त्याची टक्कर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला सर्बियाचा गतविजेता जोकोविच याच्याशी होणार आहे.

बॅकहँड वि. अँग्युलर टॉपस्पिन फोरहँड

अनेक वर्षे नदालच्या अँग्युलर टॉपस्पिन फोरहँड फेडररची डोकेदुखी बनला होता. ‘ये मेरे बाएं हात का खेल’ या डायलॉगची आठवण करून देत फेडररने आपल्या एकहाती बॅकहँडने नदालच्या अँग्युलर टॉपस्पिन फोरहँडला निष्प्रभ करून टाकले. नदालविरुद्ध अनेक दीर्घ रॅलीज जिंकत आपल्या राजेशाही परिपूर्ण खेळाने विम्बल्डनचा बादशहा मीच याची फेडररने सार्‍या जगाला आठवण करून दिली.

रायव्हलरी

विम्बल्डनने गेल्या 133 वर्षांमध्ये अनेक स्थित्यंतरे, अनेक पर्व अनुभवली आहेत. एडबर्ग-बेकर-आगासी-सॅम्प्रास हे तळपते टेनिसपटू सूर्यास्ताकडे झुकले आणि जे सध्या गाजत आहे असे एक नवे पर्व जन्मास आले. हे पर्व म्हणजे 2004 पासून 2019 पर्यंत ज्याला नक्कीच फेडरर-नदाल-जोकोविच या त्रिकुटाचे पर्व म्हणता येईल.

सर्वोत्कृष्ट कोण

फेडरर आणि नदाल या दोन खेळाडूंतील सर्वोत्कृष्ट कोण यावरून वादविवाद नेहमीच रंगला आहे. या दोघांत तुलना होऊ शकत नाही असा एक मतप्रवाह आहे. तर वय, 20 ग्रँडस्लॅम जेतेपदं आणि बीजिंग ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या दुहेरीत सुवर्णपदक पाहता फेडररच सर्वोत्कृष्ट असल्याचा दुसरा मतप्रवाह आहे.  तसेच 18 ग्रँडस्लॅम जेतेपदं, बीजिंग ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या एकेरीत सुवर्णपदक (करीअर गोल्डन स्लॅम) तसेच स्पेनला डेव्हिस कप मिळवून देणारा नदालच सर्वोत्कृष्ट असल्याचा तिसरा मतप्रवाह आहे. फेडरर आणि नदालमध्ये आत्तापर्यंत 40 सामन्यांपैकी 24 सामने नदालने जिंकलेत, तर 16 सामन्यांमध्ये फेडरर वरचढ ठरलाय. ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत दोन्ही लढती नदालने जिंकल्या आहेत (फ्रेंच आणि ऑस्ट्रेलियन). तसेच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत सहा वेळा नदाल (4 वेळेस फ्रेंच, एक-एक वेळेस विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन), तर दोनवेळा फेडरर अजिंक्य ठरला आहे. फेडररने हे दोन्ही विजय विम्बल्डन येथे मिळवले आहेत.

अवलंबले नवे तंत्र!

नदाल चेंडू कुठे परतवेल या संभ्रमास कंटाळून फेडररने नवे तंत्र अवलंबले. आपल्या बॅकहँडला येणार्‍या नदालच्या अँग्युलर टॉपस्पिन फोरहँडचे प्रत्युत्तर म्हणून मारलेला फटका कमजोर न पडू देता आणि कोर्टच्या मध्यावर न परतवता फेडरर विरुद्ध कोर्टच्या बेस लाइनपर्यंत मारू लागला. फेडरर हा डावपेच लक्षात येताच नदाल त्याच्या बॅकहँडने न खेळता फोरहँड विनर्स मारू लागला.