
इंडिगोची सेवा कोलमडल्याने लाखो विमान प्रवाशांना मोठा फटका बसला. त्यातच वैमानिक आणि विमान कर्मचाऱ्यांचे कामाचे तास याबाबतच्या नव्या नियमांपासून सरकारने इंडिगोला दिलेली मुभा, तसेच उद्योगपती गौतम अदानी यांनी आठ दिवसांपूर्वीच खरेदी केलेली फ्लाइट स्टिम्युलेटर कंपनी यावरून इंडिगो प्रकरणाशी उद्योगपती अदानींचा काही संबंध आहे का, असा प्रश्न करत केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
इंडिगो विमान सेवेच्या गोंधळाबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषद घेत केंद्र सरकार, डीजीसीए आणि विमान कंपन्यांवर गंभीर आरोप केले. इंडिगोचा प्रवासी क्रायसिस हा अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक प्रकार आहे. विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मत्तेदारी, नियमांचे उल्लंघन आणि सरकार-एअरलाइन यांच्यातील कथित संगनमतामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली. विमान उड्डाणाच्या या संपूर्ण गोंधळावर 15 दिवसांत अहवाल देणारी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी, अशी मागणी त्यांनी केली.
पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या सूचना
डीजीसीएने 1 जुलै 2024 पासून लागू केलेल्या नियमांची अंमलबजावणी न झाल्याने विमान कंपन्यांची मत्तेदारी वाढत गेली.
2004 मध्ये 10 विमान कंपन्या होत्या. आज विमान क्षेत्रात केवळ दोनच कंपन्यांची मत्तेदारी राहिली आहे.
इंडिगो 65 टक्के आणि टाटा समूह 30 टक्के ही स्थिती अत्यंत धोकादायक आहे.
हे लक्षात घेता सरकारने स्वतःची विमान कंपनी सुरू करावी.
इंडिगोने भाजपाला दिली होती 56 कोटींची देणगी
केंद्र सरकारने वैमानिक व कर्मचाऱ्यांचे कामाचे तास याबाबतचे नियम लागू केले. मात्र, या नव्या नियमांच्या अंमलबजावणीसाठी तयारी केली नाही. त्यामुळे इंडिगोची सेवा कोलमडली. मात्र, इंडिगो कंपनीला नियमांमधून सूट का दिली? निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून इंडिगोने भाजपाला 56 कोटी रुपयांची देणगी दिली होती. त्याचा काही संबंध आहे का याबाबत तपास होणे आवश्यक असल्याचे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

























































