रेल्वेच्या आठ प्रवेशद्वारांवरून डोंबिवली गायब; शिवसेनेचे प्रशासनाला पत्र

नुतनीकरण आणि सुशोभिकरण करताना डोंबिवली रेल्वे स्थानकाची ओळखच पुसण्यात आली आहे. स्थानकात जाण्यासाठी असलेल्या आठ प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, साहित्यनगरी, उद्योगनगरी अशी बिरुदावली रेखाटण्यात आली आहे. मात्र या प्रवेशद्वारांवर कुठेही डोंबिवली असा उल्लेख केला गेलेला नाही. त्यामुळे कामानिमित्ताने शहरात येणाऱ्या नवीन प्रवाशांचा गोंधळ उडतो. प्रशासनाच्या या अजब-गजब कारभार सुधारून तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासाठी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी विभागप्रमुख तथा ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा प्रसारक प्रमोद कांबळे यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे.

गेल्या वर्षापासून डोंबिवली स्थानकाचे नूतनीकरण, डागडुजी, प्लॅटफॉर्म रुंदीकरण, वाढीव जिना, सरकते जिने, पत्र्याचे शेड अशी अनेक कामे सुरू आहेत. सदर नूतनीकरणाचे आणि सुशोभिकरणाचे काम करत असताना रेल्वे प्रशासनाकडून डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आठ प्रवेशद्वारांवर डोंबिवली असा ठळक उल्लेख करण्याऐवजी त्या ठिकाणी नाट्य नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी अशी नावे रेखाटण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने डोंबिवलीत येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडतो. नक्की आपण डोंबिवली स्थानकातच उतरलो का? अशी शंका मनात येऊन जाते. याबाबत अनेक प्रवाशांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रमोद कांबळे यांनी मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. तसेच स्थानकाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर ठळक मराठीमध्ये ‘डोंबिवल १’ नावाचा उल्लेख करावा अशी मागणी केली आहे.

.. तर आंदोलन करू

डोंबिवली शहराचा उल्लेख करताना अनेक उपमा दिल्या जातात. मात्र यामुळे आपण मूळ नाव मिटवू शकत नाही. त्यामुळे स्थानकाच्या बाहेरील कमानीवर डोंबिवली हे मूळ नाव लिहावे, तसेच अनेक दिवसापासून रेंगाळत चाललेली कामे लवकरात लवकर पूर्णत्वास आणावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करू, असा इशारा माजी विभागप्रमुख प्रमोद कांबळे यांनी दिला.